छोट्याश्या गावातून येऊन शहरात स्वतःचा फ्लॅट, चारचाकी गाडी, एक छान जर्मन शेपर्ड कुत्रा रिंगर आणि एका चांगल्या आंतरराष्ट्रीय खाजगी कंपनीत सहा आकडी पगार घेणारा विनय आणि विनंती याच्या घरी लवकरच तिसरं माणूस रहायला येणार असत. तिसऱ्या माणसाची येण्याची आतुरता, त्यासाठी लागणारी तयारी यात विनय बराच कष्ट घेत होता. रात्रीचे जेवण उरकल्यावर विनंतीचा हात हातात घेऊन बाल्कनीत हवा खात बसला होता. नेहमी बडबड करणारी विनंती आज कमालीची शांत आणि कोणत्यातरी विचारात मग्न होती.
लग्न झाल्यावर पहिली दोन वर्षे लगेच मुल नको असा हट्ट करणारी नंतर मुलं होत नाही म्हणून नाही नाही त्या देवाला जाणारी, देवापुढे लोटांगणे झाली, प्रतिष्ठित डॉक्टरांचे उपचार यानंतर अडीच वर्षांनी कुठं विनय-विनंती यांच्या घरात पाळणा हलणार होता. जितका जास्त आनंद विनंतीला होता त्यापेक्षा कैक जास्त पट विनयच्या चेहऱ्यावर तिला दिसत होता. डिलिव्हरीला किमान महिना अवकाश होता पण त्याआधी घराला रंग, येणाऱ्या मुलांसाठी कपडे, खेळणी, पाळणा सगळी तयारी झाली होती तरीही ऑफिसच्या कामातून विनयला यापेक्षा जास्त वेळ काढता येईल असे नव्हते मग मुलं झाल्यानंतर त्याची देखभाल असेल की घरातील कामासोबत विनय त्याची ऑफिसची तयारी, एकंदरीत सगळा संसार कस सावरायचे अश्या प्रश्नात विनंती अडकून पडली होती.
न राहवून शेवटी विनयने त्या शांततेला संपवण्यासाठी काळजीपोटी तुला काही होत तर नाही ना? इतकी कशी तू शांत आज? असा प्रश्न विचारला. विनंतीदेखील सगळं ठीक आहे असं म्हणत वेळ काढून नेण्याचा प्रयत्न करत होती पण विनयला तिची देहबोली, चिंताचुर चेहरा समजून येत होता. विनंतीने मनातील सल बोलून दाखवली, कदाचित येणाऱ्या मुलाची तयारी करण्यात गुंग असणारा विनय विनंतीने उभे केलेले प्रश्न याचा विचारच केला नव्हता पण विनंतीच्या प्रश्नाचे उत्तर त्याने लगेच दिले. विनंतीला तिच्या आईला काही महिण्यासाठी आपल्याकडे रहायला बोलावं म्हणजे सगळी चिंताच दूर होईल असं म्हणाला. त्याच्या ह्या तोडग्यावर मात्र विनंतीच्या कपाळावरील आठ्या मोठ्या झाल्या.
खरतर तिला अश्याच पर्यायाची अपेक्षा होती पण येणाऱ्या बाळाचे सगळं करून, घरातील सगळी जवाबदारी तिला स्वतःच्या आईंच्या अंगावर पडावी अशी लांबलांबपर्यत इच्छा नव्हती. तिच्या आईला बोलवावे ती केवळ बाळंतपणानंतर सोबत म्हणून पण विनयच्या ह्या पर्यायमुळे विनंतीला मांडलेल्या सारीपाटात सोंगट्या चुकीच्या पडल्याची भावना मनात उभी राहिली.
विनय विनंती याचा प्रेम विवाह मात्र त्यासाठी दोघांनी आपापल्या घरातून परवानगी मिळवली होती हे विशेष. विनंती आणि विनय याची पहिली भेट झालेली ती ऑफिसमध्ये, तिथूनच त्याचे प्रेम फुलत गेले होते. लहानपणापासून लाडाने वाढलेल्या विनंतीला आपल्या आई बापाचा खूपच जास्त लळा होता म्हणूनच लग्नानंतर आई वडिलांच्या सोसायटीच्या जवळ असलेला फ्लॅट तिने विनयला बुक करायला भाग पाडले होते. रिंगर म्हणजे हट्टाने आणलेल्या जर्मन शेफर्ड ह्या कुत्र्याला फिरवण्याच्या बहाण्याने रोजचे तिचे आई वडील राहतात त्या सोसायटीत येणे जाणे होते. लग्न झाल्यावर रितिभाती पाळण्याच्या बहाण्याने विनयच्या जन्मगावी असलेल्या घरी जे चार पाच दिवस काढले ते सोडले तर परत कधी विनंती गावाकडच्या घरी गेली नव्हती. विनयच्या घरची परिस्थिती बेताचीच त्याने जे काही कमावले होते ते स्वतःच्या मेहनतीवर पण गावाकडचे घर असेल की गावातल्या घरात एकटी राहणारी विनयची आई ह्या दोन्ही गोष्टी काही तिला पटलेल्या नव्हत्या. प्रत्येकवेळी विनय वर्षातून एकदा दोनदा गावाकडे एकटाच आईला भेटायला जात असे.
कपाळावरच्या आठ्या पाहत विनय चिंतेच्या स्वरात विनंतीला काळजीचे कारण विचारू लागला. विनंती अक्षरशः अश्याच प्रसंगाची वाट पाहत होती की काय देव जाणे पण तिने विनयच्या आईला बाळाची काळजी घेण्यासाठी आणण्याचा हट्ट केला त्याचबरोबर काही दिवस आपल्याला त्याच्या बरोबर राहता येईल असा युक्तिवादही केला. अनपेक्षित पर्याय दिल्याने खरतर विनयला आश्चर्याचा धक्का बसला पण त्याला देखील हा पर्याय खूपच आवडला होता. पुढच्या रविवारीच जाऊन आईला घेऊन येतो असे म्हणत चला आता उद्या कामाला जायचे आहे म्हणत विनंतीला उभं करत पावले बेडरूमच्या दिशेला टाकली.
विनयची आई खूपच सदाचारी, विनयचे वडील गेल्यानंतरही गावाकडच्या घरात एकटीच राहण्याचा तिचाच निर्णय होता. तसही तिला मुलाच्या शहरी भागात जमवून घेता येईल असं वाटत नव्हते त्यापेक्षा लग्न झालेल्या पोराच्या संसारात आपली कशाला लुडबुड म्हणून हट्टाने ती गावाकडे राहिली होती. कमी शिकलेली, गावाकडील ग्रामीण लेहज्यात बोलणारी, टिपिकल गावातील थोराड बायकांसारखी पेहराव करणारी विनयची आई विनंतीला आवडली नव्हती म्हणूनच कामपूरते बोलण्यापलीकडे दोघींचे इतक्या वर्षात बोलणे नव्हते.
चुटकी वाजवावी तस आठवडा निघून गेला, रविवारी सकाळी लवकर उठून विनय गावाकडे आईला आणण्यासाठी निघाला. विनयला विनंतीचा हा निर्णय खूप आवडला होता आणि तो त्याच्या गावाला जाण्याच्या घाईत स्पष्ट दिसत होता. घाईघाईने त्याने आपली गाडी गावाकडे वळवली आणि जितक्या लवकर शक्य होते तितक्या लवकर त्याने गाव गाठले. कोणतीही पूर्वसूचना नसल्याने विनयची आई विनयला पाहून गडबडलेली पण विनयने त्याचे येण्याचे कारण सांगितल्यावर मात्र ती सुखावून गेली. तिचे डोळे हलकेच ओले झाले, भरून आलेले विनयच्या लक्षात आलेच होते. लगबगीने पोराच्या घरी जाण्याची तयारी विनयची आईने केली आणि माय लेक शहराच्या दिशेने मार्गस्थ झाले.
विनयच्या घरात लक्ष्मी आली, लहान मुलीची, सुनेची, लेकाची, घरातील काम आणि रिंगर कुत्र्याची सगळी जवाबदारी विनयच्या आईने स्वतःच्या डोक्यावर सक्षमपणे सांभाळली होती. घरातील स्वछता असेल की स्वयंपाक, बाळाची काळजी असेल की कुत्रा रिंगर याला सोसायटीच्या परिसरात फिरून आणणे ह्या सगळ्या जवाबदाऱ्या सहन होत नसतानाही विनयची आई अगदी सहजरित्या पेलून नेत होती. विनंतीची आईदेखील दररोज आपल्या लेकीला भेटायला यायची मात्र बेडरूमचा दरवाजा बंद करून माय लेकी एकत्र तासंतास गप्पा मारण्यापलीकडे काही दुसर करत नसत. हळू हळू का होईना दिवस सरले छोटी वेदा आता वर्षाची झाली होती. वर्षभराची सवयीचा भाग असेल म्हणूनच की काय घराची सर्व जवाबदारी अजूनही विनयची आई समर्थपणे वाहत होती.
विनंतीला कोणतेच काम पडत नसले तरी विनयची आईशी सलगी, वेदांचे आजीकडे झुकत चाललेला ओढा डोळ्यात, डोक्यात खुपत होता. विनंतीला परत आपले घर आणि ती, विनय आणि लेक वेदा याच्या त्रिकोणी कुटुंबाचे स्वप्ने पडू लागली म्हणूनच की काय हळूहळू घरात कुरबुरी, भांड्याला भांड लागण्याचे प्रमाण वाढत होते. विनंती आता विनयच्या आईच्या कामातील चुका त्यावर बोलणे विनय समोर चालू केले होते. वेदाला जरी मारून मुटकून बेडरूम मध्ये कोंडून ठेवणे, आजीकडे जाण्यापासून थांबवण तिला शक्य झाले असले तरी विनय असेल की रिंगर मात्र म्हतारीच्या आसपास सदैव असत. कधी कधी विनयच्या आईचा राग रिंगरवर देखील काढायला आता विनंती मागेपुढे पाहत नव्हती. घरातील वाद, विसंगती दिवसेंदिवस वाढतच होती.
गावाकडचे घराची भिंत पावसाळ्यात पडली होती आणि शहरातील घरातील नात्यांना तडे पडत चालले होते. विनयचे परिस्थिती सामान्य करण्याचे प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होते आणि सरत शेवटी मार्ग निघाला तो वृध्दाश्रमाचा.....................
कोणत्याही माऊलींवर जी वेळ येऊ नये ती वेळ आज विनयच्या आईवर आली होती. विनय ह्या निर्णयावर खुश तर अजिबात नव्हताच पण बायकोच्या हट्टामुळे आणि आईची होणारी फरकटदेखील तो पाहू शकत नव्हता. शहरात त्याने एक वृध्दाश्रम शोधले होते आणि आता उद्या तिकडे आईला घेऊन जायची कठीण जवाबदारी त्याच्यावर पडली होती. दररोज टिक टिक करणारे घड्याळ आज काहीश्या जास्त वेगाने पळते आहे की काय अस विनयला वाटू लागले.
सकाळ झाली, रोजच्या सवयीप्रमाणे सगळी कामे चोख बजावत विनयच्या आईने स्वतःची पिशवी भरली. मुलाचा संसार, त्याचे घर संसार, मुलगी वेदा याना डोळयांत किती सामावून घेऊ आणि किती नको असं तिला झाले होते. चेहऱ्यावर जरी दाखवत नसले तरी मनाने विनयची आई खचलेली होती. वेदांच्या गालावर पापा घेत नकळत तिच्या डोळ्यातला एक अश्रु वेदाच्या कपाळावर पडला, कोणाला तो दिसू नये ह्या तत्परतेने तो पुसून टाकत लेका सुनेला आशीर्वाद देत माऊली घराच्या बाहेर पाऊल टाकले. बाहेर रिंगर शेपटी हलवत उभा होता, आता फेरफटका मारायला जायचे म्हणून उगाच विनयच्या आईच्या पायाशी घोटाळत होता पण आज त्याला फिरायला जायला मिळणार नव्हते हे त्याला माहित नव्हते. विनयने मोठ्या मुश्कीलीने त्याला पिंजऱ्यात बंद केले आणि आईला घेऊन तो वृध्दाश्रमाच्या रस्त्याला लागला होता.
विनयची आई वृद्धाश्रमात जाऊन दोन दिवस झाले होते, घरात दररोज असणारी गडबड सारखीच असली तरी आई घरात नसल्याची पदोपदी आठवण विनय, वेदा आणि पटणार नाही पण रिंगरला देखीक होत होती. विनंती मात्र कोणतीही भावना चेहऱ्यावर न आणत घरात वावरत होती. वर्षभर आरामात काढल्यानंतर तिला आता घरातील कामे होत नव्हती, त्यात विनयची तयारी, घराची स्वछता, आवराआवर, स्वयंपाक, वेदाच्या मागे पुढे पळणे यात तिची धावपळ होत होती. सगळ्या कामाच्या गराड्यात रिंगर कडे दुर्लक्ष होणे साहजिकच होत. थकलेली भाजलेली विनंती आता पहाटे उठू लागली आणि घर सांभाळू लागली होती. दरवाजा उघडून तिने सवयीप्रमाणे रिंगरच्या पाण्याच्या भांड्यात त्याचा पीडिग्री टाकले आणि एकदम तिला लक्षात आले की रिंगर तर पिंजऱ्यात नाहीच आहे मुळी. धावत घरात जात तिने घडलेला प्रसंग विनयला सांगितला. विनय लगोलग उठून रिंगरच्या शोधात बाहेर पडला. घाई गडबडीत नाईट ड्रेस वरतीच बाहेर पडला होता. सोसायटी, आजुबाजूच्या, मैदानात इतकेच काय विनंतीचा घरापर्यत त्याने रिंगरचा शोध घेतला पण रिंगरचा ठावठिकाणा काही त्याला लागला नव्हता. ऑफिसला जायची तयारी बाकी असल्याने तो घरी परतला आणि रिंगर गेला तसा परत येईल अशी अपेक्षा करायला लागला. नाहीच आला तर ऑफिसमधून परतल्यावर त्याचा शोध घेण्याची चर्चा विनय विनंती यात झाली.
घड्याळाचे काटे वेगाने ओहिरत होते. ऑफिसमध्ये असणारी मिटिंग यामुळे घाईत तो बाथरूम मध्ये अंघोळीसाठी घुसला. इकडे विनंती ब्रेकफास्टच्या तयारीला लागलेली. लॅपटॉप, मोबाईल जय्यत तयारी करून ब्रेकफास्ट करायला घेत असतानाच विनयचे लक्ष मोबाईलवर पडले,जवळपास पंधरा मिस कॉल पाहून तो तर बुचकळ्यात पडलेला होता. ते पंधरा मिस कॉल एका अपरिचित नंबरवरून आले होते. विनयच्या काही लक्षात आले नसले तरी अनाहूतपणे त्याने त्या नंबरवर रिटर्न कॉल केला. दुसऱ्या बाजूने त्रासिक आवाज करत एक वृद्ध हॅलो म्हणत जवळजवळ विनयवर खेकसला होता. तो फोन त्याच्या आईच्या वृद्धाश्रमातून होता. फोनवरील खाष्ट म्हातारा विनयची कोणतीही दयामाया न करता त्याला झाप झाप झापत होता. पंधरा पंधरा कॉल करून ते न उचलणाऱ्या विनयला अक्षरशः बोलुही देत नव्हता. रागाच्या भरात तो चिडलेला व्यक्ती म्हणाला
" हे वृद्धाश्रम आहे, वृध्दाश्रम. हे काही पाळीव प्राणी सांभाळायचे ठिकाण नाही. विशेषतः इथे सगळेच म्हातारी माणस असताना पाळीव प्राणी निषिद्ध आहेत असे असतानाही केवळ दोन दिवसांपूर्वी आलेल्या तुमच्या माणसाने एक कुत्रा घरात आणला हे काही योग्य नाही, वृध्दाश्रमाच्या नियमांची तमा न बाळगणाऱ्या, वेळेवर कॉल न घेणारे तुम्ही आताच्या आता इथे या"
एव्हाना घडलेला प्रकार विनयच्या लक्षात आला होता, ब्रेकफास्टचे ताट बाजूला सारत तो थेट वृद्धाश्रमात निघाला. काही मिनिटात तो वृद्धाश्रमात पोहचला होता. वृद्धाश्रमाच्या बागेत शेपटी हलवत रिंगर विनयच्या आईच्या पायाशी बसलेला होता, मध्येच तो उड्या मारत तर कधी आईच्या पायात घोटाळत होता. मुक्या जनावर ते पण वर्षभराच्या जिव्हाळ्याच्या बदल्यात त्याने पिंजरा तोडून विनयच्या आईकडे धाव घेतली होती, विनय मात्र पिंजऱ्यात अडकून राहिला होता. रिंगरच्या एका कृतीने त्याने केलेली चूक त्याच्या लक्षात आली. केलेली चूक त्याच्या इतकी जिव्हारी लागली होती त्याच्या डोळ्यातून कधी पाणी गळायला लागले हे त्याला देखील समजले नाही. आपसूक मुलाची आणि आईची दुरून का होईना नजरानजर झाली. लहान पोर जस धावत जात तसा विनय आईकडे धावत गेला. आईच ती, तिला तिच्या लेकरांच्या भावना समजल्या होत्या तसही तिच्या मनात कोणताही राग नव्हता पण पळत आलेल्या लेकाला पाहतच तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य उभारले होते. विनय पळत येताच त्याने माऊलीचे पाय धरले. धाय मोकलून तो रडू लागला. त्याच्या रडण्याने वृद्धाश्रमातले सगळेच लोक बाहेर येऊन घडणारा प्रकार पाहत होते. विनय आईचे पाय धरत माफी मागत होता, आताच्या आता परत घरी चल अशी विनवणी करत
समाप्त.................
लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा, असेच लेख वाचण्यासाठी follow करा.
ट्विटर @pincode410501
ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com
डेलीहंट @cm_newsinformation