साधारणतः संध्याकाळ झाली की गावाबाहेरील त्या वस्तीत पुरुषाची वर्दळ वाढायची. ती वस्ती शरीर विकणाऱ्या काही स्त्रियांची होती. त्याची वेळ वाईट म्हणून त्या ह्या मार्गाला लागल्या असतील पण एकदा का त्या नरकात पडले की तेच त्याचे आयुष्य बनते. काही स्वतःहून तर काही इच्छेविरुद्ध शरीर विकण्याचे हे काम करत असत. ह्या वस्तीत आयशा नावाची एक सुंदर स्त्री होती जिच्या सुंदरतेवर भाळलेले अनेक जण देहभान विसरून त्या गल्लीत फेरफटका मारायचे. काही पैश्याच्या मोबदल्यात तिच्या शरीराचा मनसोक्त उपभोग घ्यायचे, लचके तोडायचे. एकाची शरीराची भूक संपते ना संपते तिथं दुसरा ग्राहक रांगेत असायचा आणि शरीराचा उपभोगण्याचा हा कार्यक्रम न थांबता अव्याहतपणे चालूच रहायचा.....
वस्तीच्या हाकेच्या अंतरावर एक जुनी मशीद होती आणि मशिदीची देखभाल करण्यासाठी तिथं एक मुल्ला, अब्दुल दिवसरात्र काबाडकष्ट करायचा. मशिदीमधली साफसफाई, नीटनेटकेपण आणि दिवसातून पाच वेळा अजाण देणारा अब्दुल दिवसरात्र अल्लाच्या नामस्मरणात काढायचा. त्याचा दिवसाची सुरुवात उजाडण्यापूर्वी तर शेवट रात्री उशिरा होत असायचा.
दोन भिन्न व्यक्ती, भिन्न कामाचे स्वरूप एकाला समाजात उच्च स्थान होते तर दुसऱ्याचे समाजात स्थानच नव्हते. असे असले तरी देवाने बनवलेल्या ह्या सृष्टीवर दोघेही देवाने त्याच्यासाठी लिहलेल्या पटकथेत आपआपली पात्र आयशा आणि अब्दुल निभावत होते.
दिवसांमागून दिवस सरत होते. दिवस उजाडण्यापूर्वी अब्दुल ईश्वरी सेवेत रुजू व्हायचा तर दिवस मावळल्यावर आयशा कामाला रुजू व्हायची. अश्याच एका सकाळी अचानक धरणी थरथरू लागते झोपलेल्याना जागे होण्याआधी धरणीकंप होतो. झाडे, इमारती जोरजोरात थरथरू लागतात. काळ कोणाला काही समजण्याच्या आधीच घाव घालतो आणि पत्त्याच इमारत कोसाळावी तसे गावातील मातीची घरे, दुमजली इमारती जमीनदोस्त होतात ह्याला अपवाद ना अब्दूलची मशीद होती ना आयशाची कोठी. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते, सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती........
शांतता सहन करण्याच्या पलीकडे गेली होती, जड झालेले डोळे मिचकवत, डोळे चोळत अब्दुल उभा राहण्यासाठी प्रयत्न करू लागला. डोळ्यासमोर लख्ख पांढरा प्रकाश यामुळे अब्दुलचे डोळे पूर्ण उघडेही होत नव्हते. डोळे छोटे मोठे करून अब्दुल सभोवताली पाहू लागला. अब्दूलच्या डोळयांसमोर स्वच्छ पांढऱ्या कपड्यात असलेले लहान मोठ्या लोकांची गर्दी होती. काही काळ्या कपड्यात असणारी लोक सर्वांना रांगेत उभे करत, गर्दीला आवरण्याचे काम करत होती. गर्दीतले बहुतेक सगळेच त्या गावातील लोक होते, काहींचे डोके फुटलेले होते तर कोणाचे हात पाय तुटले होते. जखमी लोकांची तर गणनाच होऊ शकत नव्हती. काही कण्हत होते,काही रडत होते तर कोणी शून्यात पाहत उभे होते. ज्यांना वेदना सहन होत नव्हत्या ते मोठंमोठ्याने ओरडत होते आणि ह्याच लोकांचा गोंधळ कमी करण्यासाठी काळे कपडे घातलेले, रांगडे, मोठ्या मोठ्या मिश्या असलेले, हातात चाबूक असलेले, अंगा खांद्याने धिप्पाड लोक आकाश पातळ एक करत होते. अचानक एक हात अब्दूलच्या खांद्यांवर पडला, मागे वळून पाहताच तोच एक धिप्पाड माणूस रांगेत उभे राहण्याची खून अब्दूलला करू लागला.
तिथं दोन रांगा होत्या त्यातल्या एका रांगेत अब्दूलला त्या माणसाने उभे केले. हळूहळू दोन्ही रांगा मुंगीच्या गतीने पुढे सरकू लागल्या. अब्दूलला नक्की काय होतंय हे समजतच नव्हतं, कोणाला काही विचारावं तर कोणी बोलत नव्हतं, बोलायला जावं तर जोरात चाबकाचे आसूड पाठीवर ती धिप्पाड माणस मारायला मागे पुढे पाहत नव्हती. शेवटी पर्यायच नसल्याने अब्दुल रांगेत हळूहळू पुढे सरकत राहिला.
आजूबाजूला ओळखीचे कोणी दिसत का याचा अंदाज घेऊ लागला त्यातच त्याला दुसऱ्या रांगेत गावातील पुरुष जिच्या सुंदरतेवर भाळले होते ती ललना आयशा दिसली. अब्दुल तिची सुंदरता पाहतच राहिला. आयशा संथ पाण्यासारखी शांत होती, चेहऱ्यावर जखमा असल्या तरी कोणतीही संवेदना चेहऱ्यावर न दाखवत, दुःखी अंतकरणाने रांगेत मार्गस्थ होत होती. आयशाला पाहण्यात अब्दुल देहभान विसरला, वेळचे त्याला भान राहिले नाही अश्यात त्याची ही तंद्री एका कणखर आवाजाने तुटली.
गर्दीला नियंत्रित करणाऱ्या लोकांचा सरदार अब्दूलला हाक मारत असतो. सरदारांच्या हातात एक पुस्तक असते त्या पुस्तकातील नोंदी पाहत त्याने अब्दूलच्या पायापासून चेहऱ्याचे निरीक्षण करत, तुच्छतेने पाहत मोठ्याने ओरडला
" जहन्नुम "
अतिशय निष्ठुरतेने दोघांनी अब्दूलला पकडले आणि खेचू लागले. अब्दूलला काही समजत नव्हते पण जखमी असूनही तो त्या धिप्पाड माणसाला प्रतिकार करू लागला, हाथ पाय झाडू लागला ओरडू लागला. सरदार पुढच्या व्यक्तीला पाहत पुस्तकात पाहू लागला आणि मोठ्याने ओरडला
" जन्नत"
ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आयशा होती.
जहन्नुम, जन्नत याच्या रांगा, गर्दीला नियंत्रित करणारे लोक यावरून अब्दूल समजून चुकला की भूकंपाच्या आघातात आपण जिवंत राहिलेलो नाही तसेच रांगेत असलेले हे सगळे देखील मरण पावले आहे. आयुष्यभर केलेल्या कर्माचे फळ म्हणून जहन्नुम, जन्नत ची विभागणी होत होती. स्वतः अब्दुल जहन्नुम तर शरीरविक्री करणारी आयशा जन्नतमध्ये हे पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती.
जहन्नुमचा दरवाजा जवळ येत होता, अब्दुल विनवण्या करत होता, ओरडत जाब विचारत होता, एकच गोंधळ घालत होता हे पाहून सरदाराने त्याला त्याला ओढणाऱ्या सेवकांना थांबवले आणि परत बोलवले.
जहन्नुम म्हणजे आगीत होरपळण्याची शिक्षा तर जन्नत म्हणजे 72 हूर आणि खाण्यापिण्याची आलबेल, सुखच सुख आणि तेच सुख हातातून निसटताना पाहून रडवेला चेहरा करत सरदाराला तो कोण, त्याने आयुष्य कसे व्यतीत केले हे अब्दुल सांगू लागला. सरदाराला पुस्तकात परत बघण्यास सांगत होता, काहीतरी चूक होते आहे,माझे नाव जन्नत मध्येच असेल असं ओरडत होता. ह्या सगळ्या झटापटीत त्याचे लक्ष पुन्हा आयशाकडे गेले. अंगात असलेली सगळी शक्ती गोळा करत त्याने आयशा एक वेश्या आहे, तिचा संबंध दिवस रात्र कामक्रीडेत जात होता, ही व्यभिचारी हिला कसा जन्नत आणि माझ्यासारख्या अल्लाची भक्ती जीवापाड करणाऱ्याला जहन्नुम?
सरदाराने गोंधळ थांबवून अनिच्छेने अब्दूलची मागणीनुसार पुन्हा पुस्तकात डोकावले. अब्दुल आणि आयशा दोघांचे आयुष्य डोळ्याखालून काढले आणि आपण केलेला निर्णय योग्यच आहे असा निर्णय दिला. अब्दुल ते मान्य करत नव्हता, त्याच्या डोळ्यासमोर केवळ नरकातील आग दिसत होती आणि जन्नतमधली सुख दूर जाताना दिसत होती. जहन्नुम, जन्नतच्या दरवाज्याची रखवली करणाऱ्या त्या सरदाराने कठोर वाणीने अब्दूलला सांगितले की निर्णय योग्यच आहे. जरी तू तुझे सर्व आयुष्य चांगल्या कामात घालवले पण तुझ्या मनात मात्र कायम विषयवासना असायची, तू शरीराने मशिदीत असायचा पण मनाने मात्र कुंटखाण्यात असायचा. तुझे मन सतत शरीरसुखाची अभिलाषा बाळगत होते पण समाजात असलेल्या तुझ्या प्रतिमेमुळे तू प्रत्यकक्षात मात्र सदविवेकी माणसाचा बुरखा घालून जीवन जगत होता ह्याउलट आयशा तिचे जीवन कुंटखाण्यात व्यतीत करत होती मात्र तिच्या मनाशी सदैव कधी त्या नरकातून बाहेर पडेल, ईश्वराची सेवा करेल असे भाव होते. क्षणाक्षणाला ती ईश्वराची आठवण काढत असायची आणि त्याचेच हे फळ की ती आज जन्नत तर तू जहन्नुम मध्ये जात आहे. तुझे आणि तिचे बाह्यरूप आणि अंतरात्मा यात जमीन अस्मानचा फरक. बाह्यरुप कितीही सुंदर का असेना ज्याचे मन, अंतरात्मा कुरूप त्याला दुसरे काय मिळणार..................
समाप्त.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा