मंडळी नमस्कार, आटपाटनगर आणि त्यात घडलेल्या अनेक गोष्टी ऐकून बालपण गेले अशीच एक माझी गोष्ट तुमच्या घरातील लहानग्यासाठी.......
फार फार वर्षांपूर्वी आटपाट नगरात विक्रम राजा राज्य करत होता. विक्रम राजा प्रचंड पराक्रमी, शूर आणि तितकाच प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. विक्रम राजाची एक सुंदर राणी, सोनल आणि एक छोटा युवराज हर्षवर्धन असे सुखी कुटुंब होते. आपल्या प्रजेला कुटुंबाप्रमाणे मानणाऱ्या विक्रम राजाने आटपाट नगरातील लोकांसाठी अनेक चांगली कामे केली होती म्हणूनच केवळ आटपाट नगरात नाही तर राज्यात प्रजा सुखी होती. प्रजा सुखी, समाधानी असल्याने धनवान देखील होती आणि अश्या धनवान प्रजेतील काही व्यापाऱ्यांवर हल्ला करत लूट करणारी काही दरोदेखोरांची टोळी आटपाट नगरच्या सभोवताली असणाऱ्या जंगलात राहत होती. ह्या दरोडेखोरांना अद्दल घडवण्यासाठी विक्रम राजाने धडक मोहीम पार पाडत दरोडेखोरांच्या मोहरक्याला अटक करत तुरुंगात डांबले होते.
दरोडेखोरांचा मोहरक्या तुरुंगात अटक केल्याने विक्रम राज्यावर प्रचंड राग होता अश्या वेळी त्याने एका अमावस्येच्या रात्री तुरुंगाच्या सळया तोडून बाहेर पडला आणि लपत छपत राजा विक्रमच्या राजवड्याकडे चालायला लागला. आपल्याला कैदेत टाकणाऱ्या राजाला जन्माची अद्दल घडावी म्हणून त्याच्या डोक्यात एक कुटील डाव रंगला होता. पहारेकऱ्यांना गुंगारा देत दरोडेखोर राजाच्या शयनगृहापर्यत पोहचला. शयनगृहात राजा, राणी आणि त्याचे बाळ शांत झोपले होते. आपल्याला अटक करून कित्येक दिवस दरोडेखोराला आपल्या कुटुंबापासून दूर रहावे लागले होते तसेच इतक्या दिवसात कुटुंबावर दारिद्र्य पसरले असेल म्हणून एका दगडात दोन पक्षी मारण्याची अजब कल्पना दरोडेखोरांच्या मनात आली. लहानग्या राजपुत्राचे अपहरण करून त्याला सोडण्याच्या बदल्यात बक्कळ खंडणी बळकवण्याचा धूर्त डाव दरोडेखोराने मनात बांधला. पुढचे मागचे काही न विचार करता हळूच दरोडेखोर शयनगृहात घुसून राजा आणि राणी याच्या झोपेचा फायदा घेत लहान बाळाला अलगद उचलले. दबक्या पावलांनी शक्य तितक्या लांब जात, राजपुत्राची झोपमोड होणार नाही अशी दक्षता घेत असतानाच दरोडेखोरांच्या धक्का मंचकावर ठेवलेल्या फुलदाणील लागल्याने ती फुलदाणी खाली पडली. फुलदाणी पडल्याच्या आवाजाने राजा विक्रम याची झोप मोडली आणि परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तो पलंगावरून उठून फुलदाणी पडली तिथं गेला तेच त्याला बाहेर घोड्याचा चाप ओढून कोणीतरी भल्या मध्यरात्री घोड्यावर दौड लावत असल्याचा आवाज झाला. अवेळी घोड्यावर स्वार होण्याचा आवाज झाल्याने थोडस विचित्र वाटले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करत राजा विक्रम परत झोपण्यासाठी आपल्या पलंगावर येतो तर तिथे त्याला राणी सोनलच्या बाजूला राजपुत्र हर्षवर्धन दिसत नाही आणि गडबडलेला विक्रम राजा आपल्या राजपुत्राला शोधायला लागतो. राजाची गडबड पाहून राणी सोनल उठते, बाहेरचे पहारा देणारे सैनिक सचेत होतात आणि तितक्यात संदेश देणारा एक सैनिक महाराजाना निरोप देण्यासाठी धावत येत असतो. तुरुंगातून पाळलेला कुख्यात दरोडेखोराची वर्दी देण्यासाठी तो आला होता. त्याच्या मागोमाग दुसरा वेशिवरचा पहारेकरी घामाघूम आणि घाबरलेल्या स्थितीत महाराजांना दरोडेखोर जंगलात धूम ठोकली पण त्याच्या पाठीवर छोटे बाळ होते असा निरोप देतो.
नक्की काय घडले हे समजायला विक्रम राजाला तसूभर वेळ लागला नाही त्यामुळे तडक आपले तलवारीचे पाते म्यांनीतून बाहेर काढत राजा शयनगृहातून बाहेर पडला. महाराजांनी घेतलेला निर्णय, आपले बाळ दरोडेखोरांच्या तावडीत आहे याची खंत, भीती, दुःख राणी सोनल तर भोवळ येऊन पडली. राजा पराक्रमी, शूर होताच पण आता आपल्या बाळाच्या चिंतेने त्याचे रक्त उसळ्या मारत होते, सारे अंग गरम झाले होते डोळे तर रक्ताच्या आकाराच्या झाल्या होत्या तरीही आपल्या भावनांवर संयम बाळगत राजा घोड्यावर स्वार झाला. राजच्या मागे सैनिकांची तुकडी दरोडेखोर पळाला त्या जंगलाच्या दिशेने स्वार झालेले होते. काळजीयुक्त भीती आणि रागाच्या भरात विक्रम राजा घोड्याला इतका पळवत होता की सौनिकाची तुकडी कधी मागे राहिली हेच कळले नाही.
अमावस्येच्या त्या भयाण काळ्याकुट्ट अंधारात जंगलात घोडा स्वार करत असताना बाळाच्या अंगावरची शाल पुढे गेल्यावर राजपुत्राच्या डोक्यावरची टोपी राजाला तो योग्य मार्गावर आहे याची खात्री देत होता. दरोडेखोर देखील जोरदार घोडा पळवत होता पण घोडा जमिनीवर पडलेल्या ओंडक्याच्या अडथळ्याला धडकला आणि घात झाला. दरोडेखोर राजपुत्रासह जवळच वाहत असलेली ओढ्यात पडला. घोडा ज्याप्रकारे पडला ते पाहता तो उठेल आणि धाव घेईल याची शक्यता नसल्याने दरोडेखोर वाट मिळेल तस त्या ओढ्याच्या पाण्यात धावू लागला. धावून धाप लागलेला हा दरोडेखोर एका झाडाखाली थांबला तर त्याला जवळच अंधारात एक मांत्रिक दिव्याच्या मंद प्रकाशात काही तंत्र, काली जादू करतोय असे दिसले. धावपळीच्या गर्तेत राजपुत्र धायमोकलून रडत होते आणि त्या रडण्याचा आवाज सर्वदूर जंगलात पासरतोय की काय अशी दरोडेखोरला भीती वाटली. काही आसरा मिळेल ह्या शक्यतेने त्याने धावत जाऊन मंत्रिकाच्या गळ्यावर धारधार सुरा धरला.
घोड्याच्या टापाच माग घेत राजा विक्रम घोडा घसरला तिथपर्यत पोहचला होता. घोड्याला पाहताच त्याने आपला वेग मंदावत परिस्थितीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली तर त्याला राजपुत्राचा रडण्याचा मंद आवाज येऊ लागला. आवाजाच्या दिशेने राजाने आपला घोडा वळवला.
गळ्याला लावलेला सुरा देखील ज्या मांत्रिकाला घाबरू शकला नाही तो मांत्रिक धीरगंभीर आवाजात दरोडेखोराशी बोलू लागला. भोतीने गाळलेल्या दरोडेखोरांने नव्हती तितकी शक्ती गोळा करत लपण्याची जागा दे अन्यथा मृत्यूला सामोरा जाण्यास तयार हो अशी धमकी मांत्रिकाला दिली. मांत्रिकाने हसत हसत त्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले पण त्याबदल्यात तुझे काम झाल्यावर हे बाळ मला माझी विद्या पूर्ण करण्यासाठी द्यावे लागेल अशी इच्छा प्रकट केली. विक्रम राजा आपला मागोवा घेत जंगलात आला असेल, राजपुत्राला पळवल्याचा राग तो आपल्याला मारून टाकण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही ह्या भीतीने त्याने मंत्रिकाची अट मान्य केली. वर्षानुवर्षे काली जादूची पूजा करणारा तांत्रिक खुश झाला अरबी त्याने दरोडेखोराला आपल्या गुप्त राजवाड्यात जाण्याचा सल्ला दिला. मांत्रिकाने मदतीचे आश्वासन दिल्याने शांत झालेला दारीदेखोर राजवाड्यात जाणारा गुप्त मार्ग समजून घेण्यासाठी अधीर झाला.
मांत्रिक साधूने जवळच असलेल्या भल्या मोठ्या झाडाच्या खोडावर तीन वेळा वाजवण्याची खूण केली. तीन वेळा झाडाच्या खोडावर हात मारल्याने एक गुप्त दरवाजा खुला होऊन आता एक झोपडी दिसेल त्या झोपडीच्या दार उघडून आत असलेल्या भयंकर यज्ञात उडी मारण्यास दरोडेखोराला सांगितले. मृत्यूच्या भयाने पांढरा पडलेला दरोडेखोर मंत्रिकाच्या ह्या यावजनेवर अधिकच घाबरला आणि त्यावर चिडत म्हणाला की मरायचे असते तर त्या विक्रम राजाशी दोन हात करत लढत मेलो असतो तुझ्याकडे कशाला मदत मागितली असती म्हणत हातातील सुऱ्याने वार करण्याचा इशारा मांत्रिकाला दिला त्यावर कुटील मांत्रिक गडगडाटी आवाजात हसत न घाबरण्याचे आव्हाहन दरोडेखोराला केले त्याला शांत करत ती अग्नी जादुई आहे त्यात उडी मारल्याने तुला काही न होता तू शांत शीतल निळ्या नदीत पडशील तसेच त्या नदीत तुला दोन मासे दिसतील एक लहान तर दुसरा मोठा. लहान माश्याच्या शेपटीला स्पर्श करताच तुला मोठा मासा गिळून टाकेल आणि माझ्या गुप्त राजवाड्यावर घेऊन जाईल असे दरोडेखोराला समजावले.
राजवाड्यात जाण्याचा हा मार्ग ऐकून दरोडेखोराचे निम्मे झालेले बळ अजून निम्मे झाले पण विक्रम राजाच्या दहशतीने त्याने मांत्रिकाने सांगितलेल्या मार्गावर जाण्याचे ठरवले. कोणताही विलंब न लावता दरोडेखोर मोठे खोड असलेल्या झाडाजवळ गेला त्यावर तीन वेळा हाताचा डोसा लगावला आणि काय ते आश्चर्य मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे आत एक झोपडी होती. घाबरतच त्याने झोपडीचे दार उघडले तर आत एक तेजस्वी आणि अंगाला चटका भाजेल असा यज्ञाचा प्रखर जाळ तिथे दिसला. आगीला घाबरलेल्या दरोडेखोराशी इच्छा त्या जाळात उडी घेण्याची होईना पण तोच त्याला विक्रम राजा आणि मंत्रिकाच्या भांडणाचा आवाज येऊ लागला. इच्छा नसतानाही त्याने त्या जाळात राजपुत्रासाहित उडी टाकली तर अंग भाजणार तो अग्नी यज्ञ त्याला शीतल नदीसारखा भासू लागला. मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे समोर त्याला एक छोटा आणि एक मोठा असे दोन मासे दिसले. छोट्या माश्याला स्पर्श करतोय ना करतोय तोच बाजूला असलेला मोठा मासा आपले तोंड आ वसंत आकारमान मोठे करू लागला. क्षणांचा विलंब न होता त्या माश्याने दरोडेखोर आणि राजपुत्राला आपल्या तोंडात ओढून घेतले आणि अवघ्या काही क्षणात कैक मैल दूर अश्या भव्य राजवड्यासमोर दोघांना फेकून दिले. घडलेले खरे की खोटे ह्या संभ्रमात असलेला दरडेखोर जिवाच्या आकांताने राजवाड्यात धूम ठोकली. सर्वात प्रथम राजपुत्राला एका खोलीत बंद करत भिंतीवर लावलेल्या धारधार कुऱ्हाड आणि। तलवार हातात घेतली.
राजाने मांत्रिकाला विनंती केली, हातापाया पडला तरी मांत्रिक दरोडेखोर बद्दल बोलेना म्हणून शेवटी त्याने आपली तलवार मंत्रिकावर धरली. मांत्रिकाला राजाच्या रागाची कल्पना आल्याने त्याने निमूट दरोडेखोराला आपल्या राजवाड्यावर जाण्याचा गुप्त मार्ग सांगितला आणि सध्या तो तिथेच असेल असे सांगितले. मांत्रिकाने सांगितलेला गुप्त मार्ग परी कथेतील बाष्पळ गोष्ट तर नाही ना असे राजाला वाटले पण मांत्रिक खरेच बोलतोय खात्री झाल्यावर तो तडक मोठ्या खोडाच्या झाडाजवळ धावत गेला.
राजाने झाडाच्या खोडावर तीन वेळा टकटक केली तर दरवाजा उघडावा तसा झाडाचा खोडात एक प्रशस्त जागेत एक झोपडी राजाला नजरेला पडली. झोपडीचे दार उघडताच आत प्रचंड मोठ्या ज्वाळा अंगाच्या लाहीलाही करू लागल्या. राजपुत्राला भेटण्याच्या आतुरतेमुळे कशाचा विचार न करता राजाने त्या अग्निकुंडात उडी टाकली पण अंग जळण्यापेक्षा ते शीतल शांत नदीचा ओलावा देत होते. नदीत पडताच राजाने मासे शोधायला सुरुवात केली आणि मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे त्याने छोट्या माश्याच्या शेपटीला स्पर्श केला तसे बाजूचा मोठा मासा अजस्त्र आकार घ्यायला लागला. माश्याने राजाला आपल्या जबड्यात पकडत वाऱ्याच्या वेगाने मंत्रिकाच्या राजवाड्यावर आणून टाकले.
मंत्रिकाचा राजवाडा प्रशस्त आणि सुंदर असला तरी वातावरणात एक प्रकारची भयानकता, भीषणता होती ज्यामुळे कोणाचेही मन पिळवटून निघेल. सगळीकडे भयाण शांतता होती म्हणजेच ह्या राजवाड्यावर मंत्रिकाशिवाय कोणीही येत जात नसावे, सैनिक नसावे असा राजाने प्राथमिक अंदाज केला. तिकडे दरोडेखोराने राजाला राजवाड्यावर आल्याचे पाहिल्याने त्याच्याशी दोन हात करण्यास सिद्ध झाला. राजाने राजवाड्याच्या प्रवेशद्वारात पाय टाकतो ना टाकतो त्याला राजपुत्राच्या रडण्याचा आवाज येतो. राजा आवाजाच्या दिशेने जायला धावला तर हातात दोन धारधार तलवारी धारण करत दरोडेखोराने राजावर चाल केली. दोघांमध्ये तुंबळ लढाई जुंपली. दोघे एकमेकांवर जीवघेणे वार करत होते. एकीकडे राजपुत्राला वाचवण्याची शर्थ करणारा तर दुसरीकडे द्वेष आणि बदला घेण्याच्या मन्सूब्याने लढणारा दरोडेखोर एकमेकांवर तुल्यबळ होण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटी राजा विक्रम दरोडेखोरवर प्राणघातक हल्ला करत विजय मिळवला. धावत जात त्याने आपल्या मुलाला उचलले आणि भाव विभोर होत त्याने राजपुत्राचे अनेक मुके घेतले. राजपुत्राला घेऊन राजा विक्रम राजवाड्याच्या बाहेर पडला पण त्याच्यापुढे एक नवीन प्रश्न यक्ष म्हणून उभा होता कारण घरी परतण्याचा एकही मार्ग त्याला दिसत नव्हता. राजवाड्याच्या चोहोबाजुनी गर्जणारा समुद्र होता, ना तिथे होडी ना नाव न राजा समोर दिसते ते अंतर पोहून पार करू शकणार होता. राजपुत्र तर भेटला पण आता घरी परतायचे कसे असा मोठा प्रश्न राजासमोर आ वासून उभा होता. तिकडे जंगलात मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात मांत्रिक साधू ध्यान मुद्रेतून जागे होत एक कुटील हास्य करायला लागतो.
मित्रानो कशी वाटली गोष्ट? मग सांगणार ही गोष्ट तुमच्या घरातील लहान मुलांना? महत्वाचे म्हणजे गोष्ट अपूर्ण आहे आणि लवकरच गोष्टीचा पुढचा भाग घेऊन तुमच्यासमोर सादर करील पण त्यासाठी ह्या ब्लॉगला लाईक करा, शेयर करा.
राजा मंत्रिकाच्या सापळ्यात तर अडकला नाही ना? राजा कसा तिथून निसटणार की दुष्ट मांत्रिक आपल्या योजनेत यशस्वी होणार वा अनेक असे प्रश्न तुमच्या डोक्यात सोडत मी आज निरोप घेतो, परत भेट होईपर्यत जय श्रीकृष्णा........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा