आधाशीपणा खरेतर खाण्याच्या निगडित शब्द असला तरी जेवताना मी अधाशीपणाने ते पुस्तक घेऊन त्यात नजर घुसवली आणि एकीकडे ती नावडती भाजीचा एक एक घास ढकलू लागलो, मधेच भाजी छान झाली आहे असा सूरही लावत सौंची मर्जी संपादण्याची संधी देखील सोडत नव्हतो. पु ल चे लहानपण, कोकणात नातेवाईक यांच्यात इतरत्र फिरणे त्यातून मिळालेले अनुभव, हरहुन्नरी लोकात उठबस, मित्र परिवरातून मिळणाऱ्या मूल्यवान वेळेचा फायदा घेत थोडस खऱ्यातील भाग घेत आपल्या कल्पना विस्तारी विचारांनी आणि प्रत्येक वाक्यात हसू आणण्याचे त्याचे कसब कमाल होते. ज्या ज्या कथा पु ल नी फुलवल्या आहेत त्याला तर तोड नाही. त्याकाळी जर त्याच्या हातात भ्रमणध्वनी असता तर आज आपण किती मोठ्या अमूल्य कथा, कवितांच्या साठ्यापासून पोरके झालो असती याची कल्पना करवत नाही. तसा मी एककल्ली एकलकोंडा स्वभावाचा माझ्यासारख्या एकांगी माणसाला माझी बहिण कोपरापासून हात जोडत लाखोली वाहत असते त्यामुळे असणाऱ्या वेळेचा सदुपयोग करत डोक्यात आलेल्या आणि समोर दिसलेल्या गोष्टींची सांगड घालत लिहण्याचा मला छंद लागला पण लिहायचे काय यासाठी मात्र बहुतेक वेळा कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मदत आजपर्यंत मला झाली. आज पु ल चे हसवणूक पुस्तक ह्या गोष्टीला कारणीभूत ठरले.
विचार केला तर किती सोप्प आणि तितकेच अवघड आहे लिहणे हे कमाल उंचीच्या लेखकाची कथा वाचताना अनुभवायला मिळते. लिहताना एखादा विषय निवडणे, त्या विषयाचा धागा पकडत ती कथा फुलवणे त्यात हास्याचे तुषार उडवत वाचणाऱ्याल मंत्रमुग्ध करणे हे सोप्प काम अजिबात नाही. चेहऱ्याचे, अंग विक्षिप्त चाळे करून लोकांना हसवणे सोप्पे असते पण केवळ शब्दाच्या आधारे लोकांच्या चेऱ्यावर हसू आणणारा भाई काही आगळाच. हसवणूक पुस्तकाचा पहिल्या कथेत भाईंनी कोणताही व्यक्ती जीवन जगण्यासाठी विशिष्ट एक काम निवडतो, ते त्यांनी का निवडले ह्या साध्या प्रश्नावर ते त्याच्या जवळच्या लोकांच्या मुलाखती घेतात त्यात ज्याप्रकारे विनोद निर्माण झालाय तो अप्रतिमच. भाईंनी केवळ इतरांवर व्यंग न करता विनोदी कथा लिहण्याचा त्याच्या अनुभवाबद्दल देखील तितक्याच व्यंगात्मक शब्दात बोलतात. शब्दाची ती साखळी वाक्य आणि ती प्रत्येक वाक्य अशी पेरली जातात की कधी चिमटा घेत टीका तर कधी हलकेच बोट फिरवून गुदगुल्या करणारा हा माणूस माणसाच्या गर्दीतील असामी/ तोड नसलेला माणूसच. त्याच्याबद्दल माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीने बोलावे, लिहावे किंवा कौतुक करणे म्हणजे मुंगीने हत्ती बनण्याचा प्रकार आहे पण मुद्दामच हे सगळे लिहले कारण त्यामुळे हसवणूक पुस्तकातील पहिला भाग वाचून मनात निर्माण झालेल्या विचारांना ब्लॉगच्या रूपातून बाहेर काढले. आशा आहे की आपल्याला माझा आजचा ब्लॉग आवडेल आणि ह्या ब्लॉगमुळे तुम्हीदेखील पु ल देशपांडे वा तुमच्या कोणत्याही आवडीच्या लेखकाचे कोणते तरी एक पुस्तक धूळ खात पडलेल्या कपाटातुन बाहेर काढून वाचाल. एकामागे एक रील पाहत तासंतास अडकून राहण्यापेक्षा जिवंत आणि एक अमूल्य आनंद साजरा करण्यासाठी पुस्तकाशिवाय पर्याय नाही.
पुढची कथा वाचल्यावर लिहण्याचा मोह झालाच तर पुढचा ब्लॉग घेऊन तुमच्यासमोर सादर करीलच पण तोपर्यत ह्या ब्लॉगला लाईक करा, प्रतिक्रिया द्या कारण जे मी लिहतो आहे ते केवळ ह्याच तुमच्या प्रेमासाठी. परत भेटीपर्यत जय श्रीकृष्णा.........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा