शनिवार, १३ जुलै, २०२४

इंडियन

नेता असो की अभिनेता वा अन्य कोणीही त्याची सार्वजनिक बाजू, केलेले काम यातून एक त्याची प्रतिमा बनते आणि त्या प्रतिमेच्या प्रेमात पडून अनेक त्या लोकांच्या प्रेमात पडतात, त्याला आदर्श मानायला लागतात पण ही लोक वास्तविक त्याच्या वैयक्तिक जीवनात तसेच असतात का? नसतील कदाचित मग ह्या लोकांना त्याच्या कामाच्या बदल्यात देवत्व बहाल करून त्यांना एक आदर्श म्हणून मागे मागे फिरणाऱ्या सर्व जनतेने घेतलेला निर्णय चुकीचा नाही का? कमल हसन चित्रपटात आणि वैयक्तिक आयुष्यात अश्या दोन गोष्टीत फरक केला पाहिजे. वास्तविक मला तो चित्रपटात किंवा त्याच्या वैयक्तिक सार्वजनिक जीवनात देखील आवडत नाही तरीही त्याचा इंडियन हा चित्रपट पाहिला. वर्तमानपत्रात चित्रपटाचा रिव्ह्यू येतो त्याप्रमाणे चित्रपटाची कथा, कलाकारांची यादी सरत शेवटी चित्रपटाचा शेवट न सांगता चित्रपटातील चांगल्या आणि खराब गोष्टी अशी एकंदरीत मांडणी आणि त्याला दिलेले इतके तितके स्टार असलेले  लेख तुम्ही खूप वाचले असतील. कधी कधी ते प्रायोजित असतात तर कधी ते खरे देखील पण चित्रपट समीक्षा म्हणून ह्याच पद्धतीने लोकांना चित्रपट सांगायचा असतो हा वर्तमानपत्रांचा पायंडा पण आपले तसे नाही त्यामुळे आपण काहीही लिहू शकतो. मुळात हे सगळं वाचायचे असेल तर उद्याचा कोणताही एक पेपर विकत घेऊन हा कॉलम तुम्हाला वाचता येईल त्यामुळे तो पायंडा सोडून चित्रपट पाहिल्यावर मनात आले ते ब्लॉग मध्ये उतरवत आहे.

भ्रष्टाचार ह्या मूळ मुद्यावर असलेला हा चित्रपट पहायला अप्रतिम आहे पण आपल्याच पालक, सगेसोयरे याच्या कुकर्माची शिक्षा त्याच्याच घरातील लोक देतील का? नाही कारण एकच घरात राहून त्यानी केलेली अव्यवहार्य वागणूक पाहून पाहून ती अंग वळणी पडून गेलेली असते. मुळात आपले पालक काय बरोबर वा चुकीचे करतात हे सगळ्यांना माहीत असते पण त्याबद्दल कोणी तक्रार करू शकत नाहीत पण चित्रपटात अशी अनेक पाल्य इंडियनच्या सांगण्यावरून आपल्या पालकांना जगासमोर उघडे करतात असे दाखवले असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र पोर्श कारने ज्यावेळी आपला पाल्य दारूच्या नशेत दोन लोकांचा जीव घेतो त्यावेळी संपूर्ण कुटुंब आपल्या पाल्याला वाचवण्यासाठी कसे वागते हे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर आणल्यानंतर लक्षात येते की चित्रपट केवळ मनोरंजनाचे हत्यार आहे त्यातून केवळ मनोरंजन अपेक्षित राहिले आहे अश्या वेळी इंडियन चित्रपट आपले मनोरंजन करेलच.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ज्या पद्धतीने भ्रष्ट पात्रांचे विबंडन केले आहे ते पाहताना मज्जा तर येतेच शिवाय मतदार म्हणून कधी याला तर कधी त्याला मत द्यायचे याव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या हातात प्रत्येक वेळी मिळणाऱ्या फसवणुकीला हात चोळत बसण्याशिवाय मार्ग नाही असे सांगतो. बरे भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा होत असताना आपल्या घरापर्यत ज्यावेळी झळ पोहचते त्यावेळी योग्य असलेल्या इंडियनला हुकूमशहा, खुनी ठरवत सगळी जनता त्याच्यावर आक्रमण करते,त्याला मारायला घराबाहेर पडते. जोपर्यत इंडियन करत असलेले सामाजिक कार्य लोकांच्या घरात पोहचले नव्हते तोपर्यत आणि घरापर्यंत पोहचल्यानंतरचा इंडियन यात जनतेत झालेला बदल पाहिल्यानंतर शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात असे का म्हंटले जाते ते कळेल. घरात जेवायला काय करायचे यावरून चौकोनी कुटुंबातील चार लोकांचे चार कोपरे धरून मेनू सांगतात तर जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात लोक कोणत्या एका मतावर एक येतील का? धर्मा धर्मात आता जाती जातीत भांडणारे आहे. प्रत्येकाचे काही न काही ध्येय, त्या ध्येयात मदत करणारे अनुसारक, राजकारण किती किळसवाणे आहे याची लोकाना कल्पनाच नाही कारण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या राजकीय गटाचा अनुसारक असल्याने कोणाला तरी विरोध कोणाला तरी सपोर्ट हे भांडण काही देशात संपेल असे वाटत नाही. 

माणसाचा स्वार्थ, लोभ इतका वाढलाय की लोकसंख्येच्या गर्दीत असे कितीही इंडियन आले तरी जनता त्यांना मारून आपले स्वार्थ साध्य करतील. नैतिकतेच्या चौकटीत राहून जगणारे जितके असतील त्याच्या दहापट, शंभरपट अनैतिक लोक असणार त्यामुळे कालियुगाच्या या टप्प्यात इंडियन असो की सामान्य माणूस तो पिसला जाणार, त्याचा पराभव होणारच. आता पुढे काय इंडियन नंतर इंडियन 2 आला आणि चित्रपट संपेपर्यंत इंडियन 3 ची पुडी सोडली गेली तरी फिल्मी आणि वास्तव जीवनातील खरी दरी अधिकाधिक वाढत जात आहे, जाणार आहे. कोणी काय करावे, न करावे याचे धडे कितीही दिले तरी भ्रष्टाचार रुपी हा राक्षस दिवसेंदिवस अजून शक्तिमान होणार आहे त्यामुळे तुम्ही ज्याला आदर्श मानत आहे, बनवणार आहे तो खरच त्या आदर्श ह्या व्यक्तिरेखेच्या जवळ आहे का हे तपासले पाहिजे. योग्य आणि अयोग्य ओळखता यायला हवे. कोणाच्याही हातचे बाहुले आपण बनत तर नाही ना हे पाहिले पाहिजे. इंडियन चित्रपटात जसे स्वतःचे घर भ्रष्टाचार मुक्त करा असा नारा देतो तसे आजच्या घडीला आपले विचार, आचार चरित्रवान करण्यावर भर दिल्यास हाव, लोभ, मी, माझे, स्वार्थ यावर विजय मिळवता येईल हे सत्य असले तरी भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात असा बदल होईल का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...