शुक्रवार, २४ मार्च, २०२३

राजकारण ह्याचे नाव

राजकारण ह्याचे नाव

राजकीय व्यक्ती आणि #राजकरण यांचा स्तर कालही आणि आजही तळाशीच आहे. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी केलेले राजकीय डाव वेळप्रसंगी मागे घेत राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो म्हणत मैत्री करायची असते. एक आमदार चुकून का होईना आज एक सत्य बोलून गेला की राजकीय लोकांचा समाज एकत्रच असतो वितुष्ट कार्यकर्त्यांमध्ये असते. कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी हेच राजकारणी डावावर डाव खेळत स्वार्थ साधत असतात. थिल्लर, बालिश टीका करण्यात पुढाऱ्यांचे तोंड बंद होऊ शकत नाही तसच पद, खुर्चीची ताकद हातात असणारे कायद्याला हाताशी घेऊन विरोधकांना गतिरोध निर्माण करतात. कायदा शिक्षा करतो पण कधी पाहिले आहे का पुढाऱ्यांना शिक्षा भोगताना? काही अपवाद सोडले तर तात्पुरत्या शिक्षेनंतर बेल, कायद्याच्या पळवाटा शोधून हे पुढारी परत आपले राजकरण खेळताना मैदानात दिसतात. कधी हा माघार घेतो तर कधी तो पण सत्तेची संगीत खुर्ची सदैव ह्याच दोघांकडे असते. खेळत ते दोघे असतात पण खेळवले जाणारे आपण असतो, सर्वसामान्य माणूस. ज्याच्या आयुष्यात मर मर काम करणे, कुटुंबाच्या गरजा भागवणे, कष्टातून विरंगुळा म्हणून मनोरंजनासाठी खेळ, चित्रपट आणि राजकरण यावर भाष्य करणे यापलीकडे त्याच्या हातात असतो तो मोठा घंटा. मुळात हात रिकामेच असतात पण त्या रिकाम्या हातात नसलेली घंटा असतेच. काबाडकष्ट करणारा सामान्य माणूस स्वतःच्या मर्जीने खर्च करताना दहादा विचार करतो कारण मिळकत मर्यादित असते पण राजकारणी यापेक्षा भिन्न कारण स्वतःला मिळणारी मिळकत, भत्ते, पेंशन ठरवण्याचा हक्क स्वतः त्याच्याच हातात असतो. एकीकडे आम्ही जनतेचे सेवक म्हणून घ्यायचे, समाजकारण करतो म्हणायचे आणि दुसरीकडे व्हाईट पैसे पगार पेन्शन मधून तर वाममार्गाने ब्लॅक मनी लाटत राहायचे ह्याचे काम. जनतेचे सेवक म्हणवणारे ही लोक दादा, भाई, साहेब असतात यापेक्षा मोठा विनोद दुसरा कुठे? लिहावं तेवढ थोडंच कारण शिक्षणाच्या डिग्री घेऊन दिवसभर काबाडकष्ट करणारा सामान्य एकावेळी एकच काम करतो पण राजकारणी मात्र एकाचवेळी गल्लीतला, गावातला, सहकारी संस्था, खाजगी संस्था, खेळ, बँका,राजकीय पक्ष आणि अजून काय नाही नाही त्या ठिकाणी काम करण्याचे, निर्णय घेण्याचे काम करतो. साधं शिपाई होण्यासाठी दहावी बारावीचे सर्टिफिकेट सामान्य माणसाला लागते पण राजकारणी होण्यासाठी मात्र शिक्षणाची अटच नसते. स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी लोकांना लोकांशी भांडायला लावणारे, फायदा नुकसान याचा ताळेबंद लावून आरक्षण, नुकसान भरपाई देणारे हे पुढारी राजकारणात येतात तेव्हा रिकाम्या हाती येतात पण काही वर्षात कुबेराला ही त्याच्या घरी कामाला ठेवतात. पुढाऱ्यांत झालेला ह्या बदलाच्या विरुद्ध सामान्य माणूस खर्चाच्या डोंगराखाली कधी निम्मा तर कधी संपूर्ण बुडून जातो. सत्ता वा सत्तेच्या जवळ राहून राजकारणी सामान्य माणसाला खेळ खेळ खेळवतो. पूर्ण वेळ रिकामा असलेला हा राजकारणी क्षणांचा रिकामा नसतो. अडलेला, पडलेला, कधी स्वतःचे हित साधायला तर कधी कोणावर डुक काढणारा सामान्य माणूस राजकारण्यांच्या दाराचा उंबरा झिजवत असतो. स्वतःहून शिकार शिकाऱ्याचे तोंडात आपसूक पडत असते आणि शिकारी त्यावर ताव मारत असतो. वाचाळ राजकारणी हवे ते निरर्थक बोलतो, त्या बोलण्याची बातमी होते मीडियाच्या माध्यमाने देश,राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले जाते पण ह्याच नेत्या, पुढाऱ्यांच्या, राजकारण्यांच्या विरोधात सामान्य नागरिक बोलला की कायद्याच्या, पैश्याच्या जोरावर त्याला धडा शिकवला जातो, त्याला मारहाण केली जाते, आयुष्यातून उठवले जाते. असो इतपर्यत वाचत आलाच असाल तर एक गोष्टीची खूणगाठ नक्की मनाशी पक्की करा की तुमची आवड निवड एखाद्या राजकरण्याशी असू द्या, पक्षाशी असू द्या पण त्या लोकांना आदर्श मानण्याचा, देवत्व पद देण्याची चूक करू नका. कितीही आदर्शवत असणारा नेता हा आदर्श असेलच असे नाही कारण राजकीय डाव करणे हे त्याच्या रक्तात भिनलेले असते. कार्यकर्त्यांनो सजग व्हा रे......

हे इतकं लिहलेले का तुम्हाला माहित नाही तरीही मूर्खासारखं लिहतोय कारण मनात आलेले हे एकटा मीच विचार करत का खुडत बसावं म्हणून तुम्हाला ऐकवतोय. झालाच तर थोडा त्रास तुम्हालाही व्हायला पाहिजेच की कारण जे घडतंय त्याला जवाबदार आपण दोघेही समान भागीदार आहोत हे लिहताना एकदम मला क्रांतिवीर चित्रपटातील नाना पाटेकर आठवला. का सांगतोय मी हे तुम्हाला, का बरळतोय मी हे सर्व काही असा फील येऊन गेला. असो असाच अनुभव तुम्हाला यावा म्हणून ह्या लिंकवर क्लिक करा हवे तर

https://youtu.be/vfYJUHw5c70

असेच ब्लॉग वाचण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या

https://diarynotes137.blogspot.com


लेख आवडला तर लाईक करा, शेयर करा. पुढचा लेख घेऊन येईपर्यत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।

बुधवार, २२ मार्च, २०२३

सनातन भाग ६ : नटराज

।।ॐ नमः शिवाय।।

नमस्कार मंडळी, 

आज गुढीपाडवा, साडे तीन मुहूर्तातील एक विशेष दिवस याखेरीज हिंदू नवीन वर्ष देखील आहे, या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सनातन धर्मातील गोष्टी ह्या भागात आजची गोष्ट वा माहितीरुपी लेख आहे तो नटराज.

नटराज हे देवाचा देव महादेव शंकराचे एक नाव आहे. नटराज मुद्रा म्हणजे भगवान शंकर तांडव करत असणारी ही मुद्रा आहे. तांडव म्हंटल की क्रोधीत झालेले शंकर भगवान असा समज केला जातो पण तांडवमध्ये देखील दोन प्रकार आहेत. क्रोधीत आणि विनाश करण्यासाठी उत्सुक झालेले शिवशंकर जे तांडव करतात त्याला रौद्र तांडव अस म्हंटल जात तर आनंदात करत असलेले नृत्य म्हणजे नटराज होय.

नटराज शब्दाची फोड केल्यास नट म्हणजे कला आणि राज म्हणजे अधिपत्य. कलेचे अधिपत्य असणारी देवता म्हणून कला, नृत्य याचे शिक्षण घेणारे नटराजाच्या मूर्तीला नतमस्तक होत असतात.


नटराज मूर्तीवरील हावभाव, प्रतीक जाणून घेण्यासाठी वरील चित्र तुम्हाला मदत करेल.
नटराज चतुभुज आहे, उजव्या हातात डमरू जे सृष्टी सृजन करण्याचे तर डाव्या हातातील अग्नी सृष्टी संहार करण्याचे प्रतीक आहे. तिसरा हात भक्ताला आशीर्वाद देण्याचा तर चौथा हात जमिनीपासून वर उचललेला पायाकडे लक्ष देण्याचे सुचवतो. हे पाऊल म्हणजे मोक्ष मिळवण्याचे रस्ता अस प्रतीक असून बुटक्या दानवावर ठेवलेले पाऊल म्हणजे अहंकाराचा, अज्ञानाचा, दुःखाचा सर्वनाश करण्याचे प्रतीक आहे. शरीरावर असणारे सर्प शक्तीचे द्योतक असून नटराज मूर्तीच्या सभोवताली असणारे आगीचे वर्तुळ दुसरे तिसरे काही नसून संपूर्ण ब्रम्हांड असल्याचे प्रतीक आहे. सुटलेले केस एक प्रकारची मुक्तता, शांतता आणि आनंद दाखवत गंगा नदीचे वेगेवेगळ्या शाखा, प्रवाह दाखवत आहेत

बहुतांश लोकांना नटराज म्हणजे काय हे आज समजले असेल त्याची प्रतीक, मुद्रा यामागील भाव प्रथमतः समजले असतील तर ही पोस्ट आपल्या मित्र मंडळीत शेयर करायला अजिबात विसरू नका. नटराज यांच्या पायाशी नक्की लहान बाळ का आहे असा प्रश्न कैक लोकांच्या डोक्यात आला असेल पण ते काही लहान बाळ नसून एक बुटके दानव आहे जे अज्ञान, रोगराई याचे प्रतीक आहे. अहंकाराचा पाडाव करताना शिव कोणताही विचार करत नाही त्यामुळे मोक्ष मिळवण्यासाठी भक्तीत लिन व्हावे असच नटराज सांगत असावा.

हे झाले मूर्तीचे विस्तृत वर्णन पण ह्या नटराजाचे तुम्हाला कळलेले हे वर्णन घरात नक्की सांगायला विसरू नका कारण मिळालेलं ज्ञान स्वतःकडे ठेवल्यापेक्षा इतरांना शिकवले तर त्याचा प्रसार होईलच पण वाचलेले हे तुमच्या लक्षात देखील राहील याची मला खात्री आहे.

असाच पुढचा लेख घेऊन येईपर्यत 

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।


गुरुवार, ९ मार्च, २०२३

हटके अलोन चित्रपट

खरंतर चित्रपट हे मनोरंजनाचे साधन पण मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रश्न,समाजाला आरसा दाखवणारे चित्रपट मध्येअधे येत असतात पण हे असले चित्रपट बनवण्यासाठी निर्माते तयार नसतात कारण चित्रपटासाठी लागणारा पैसा आणि त्यातून मिळणारा परतावा ह्या गणितावर चालणारा हा व्यवसाय आहे. पैसे कमावण्याच्या हव्यासानेच कथा नसलेला, निरस चित्रपट बनवणे आणि मार्केटिंगच्या जोरावर त्यांना हिट करणे आजकाल सोपा खेळ आहे पण तरीही काही लोक केवळ पैश्याकडे न पाहता काही प्रयोग करत असतात. हे प्रयोग चित्रपट रसिक कधी आनंदाने स्वीकारतात तर कधी नाकारतात.  प्रायोगिक चित्रपट किंवा ठरलेल्या सरळढोड चित्रपटापेक्षा वेगळा प्रयत्न असणारे चित्रपट लक्षात राहतात.आज असेच तीन चित्रपट माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे.
हटके चित्रपट म्हंटल की सगळ्यात पहिले लक्षात येणारे नाव म्हणजे पुष्पक 
पुष्पक चित्रपटात एकही संवाद प्रमुख कलाकार बोलताना दिसत नाही. पूर्वीच्या काळी संवाद रेकॉर्ड करण्याचे कसब नसल्याने मूक चित्रपट बनवले जायचे. प्रत्येक खेळाच्या वेळी कसलेले कलावंत लाईव्ह म्युझिक द्यायचे पण पुष्पक चित्रपटात मुद्दाम एकही संवाद न वापरता एक सुंदर चित्र प्रेक्षकाना दिला. चित्रपटात मुख्य कलाकार जरी मुके दाखवलेले असले तरी बॅकग्राऊंडमध्ये गर्दीचा आवाज,रेडिओवरील गाणी,बाजारातील गोंधळ हे आवाज होते. 
कठीण परिस्थितीशी दोन हात करणारा सुशिक्षित बेरोजगाराला अचानक एके दिवशी एक श्रीमंत व्यक्ती नशेत रस्त्यावर भेटतो त्याला मदत करायला पुढे गेल्यावर त्याचे अपहरण करून काही दिवस श्रीमंतीचा अनुभव घ्यायचा धूर्त डाव नायकाच्या मनात येतो आणि त्यानंतर एकामागे एक असे प्रसंग घडतात की चित्रपट पाहणारा प्रसंगाच्या श्रुखलेत अडकून जातो त्यावेळी त्याला कोणत्याही संवादाची गरज पडली नसावी. हा चित्रपट म्हणजे एक मास्टर क्लासच होता हे वाचणारे कित्येक जण मान्य करतील.
दुसरा असाच हटके चित्रपट म्हणून माझ्या डोक्यात मराठी चित्रपट येतो तो म्हणजे बिनधास्त ह्या चित्रपटाचे हटकेपन म्हणजे सगळ्या महत्वाच्या भूमिका स्त्रियांनी केल्यात. यात पुरुष कलाकार आहेत पण पुरुष कलाकारांच्या तोंडी क्वचितच एखादा संवाद दिला गेला असावा. हा चित्रपट पाहणाऱ्या कित्येकांना तर हा हटके प्रयोग लक्षात आलाही असेल का अशी मनात शंका येते पण लिहले ते खोटे वाटत असेल तर नक्की या चित्रपट पहायला विसरू नका. दोन जिगरी मैत्रिणी, कॉलेज लाईफ, दोन गटातील वाद आणि एका रंगेल व्यक्तीचा खून असा रहस्यमय चित्रपट पुण्याच्या मंगला थिएटरमध्ये पाहताना मज्जाच आलेली. दोन मैत्रिणी एका खुनात अडकल्यानंतर त्यातून त्याची मैत्री सुलाखून बाहेर येते पण ह्या दोन मुलींना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठीच एकीच्या आत्याने केलेला हा एक गंमतीचा डाव अनावधानाने वेगेळेच वळण घेतो. खून झालेल्या व्यक्ती, त्याचा आरोप त्या दोन मुलींवर येणे, स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी त्यांनी केलेला। प्रतिकार,खून झालेला इसम आणि त्याची खुनाची गोष्ट म्हणजे रहस्यमय चित्रपट बिनधास्त. 
ह्या दोन हटके चित्रपट आणि हा लेख लिहण्यास कारणीभूत ठरलेला आजचा तिसरा चित्रपट म्हणजे अलोन (Alone) हा चित्रपटदेखील रहस्यमय कटेगिरीत येतो. कथेची गुंफण इतकी बेमुलायम आहे की चित्रपटात केवळ एकच व्यक्तीने अकटिंग केली आहे हे मन मान्य करणार नाही. होय या चित्रपटात केवळ एकच माणूस आहे आणि तेही संपूर्ण चित्रपटात. मुख्य आणि एकमेव कलाकार असलेला कदाचित असला प्रयोग कोणी आजपर्यत केला नसावा. कोरोना ह्या महारोगाची प्राश्वभूमी असलेला हा चित्रपटात सहकलाकाराचे आवाज तर आहे पण एकही सहकलाकार नाही. पहिल्या फ्रेमपासून ते शेवटची फ्रेम पडेपर्यत कोणताही दुसरा चेहरा दिसत नाही. कोरोना,लॉकडाउन यामुळे घरा घरात स्वतःला कैद करून घेतलेल्या गोष्टीवर एक अद्भुत चित्रपट बनवला गेला आहे. कोरोनामुळे कुटुंबापासून लांब एका फ्लॅटमध्ये आलेला चित्रपटाचा नायकाला काही भास होऊ लागतात. भूतकाळात झालेल्या दोन खून आणि त्याचा खुनी याची आभासी माहिती नायकाला मिळते. यानंतर नक्की काय होते, खून कोणाचे आणि का झाले? खुनी कोण? नायकाला होत असलेले भास की नियोजित कट यासारखी असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधायची असल्यास रहस्यमय चित्रपट अलोन पहायला हरकत नाही.

यासारखे चित्रपट, राजकारण, धार्मिक आणि काही मनातल्या गोष्टी वाचण्यासाठी follow करायला विसरू नका. अनेक इतर लेख तुम्हाला माझ्या ब्लॉगर संकेतस्थळावर पहायला मिळतील. लेख आवडत असतील, माझ्या लिखाणाचा किडा वाढवण्यासाठी लाईक, शेयर करायला विसरू नका. पुढचा असाच एखादा लेख घेऊन तुमच्या समोर सादर करेपर्यत माझा रामराम

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...