क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. सगळ्या खेळात सगळ्यात जास्त प्रेम मिळते ते क्रिकेटलाच म्हणून क्रिकेट खेळात अक्षरश: पैश्याचा पाऊस पडतो ह्याच पैशामुळे खेळाडू गडगंज श्रीमंत झालेत, भारतीय क्रिकेट बोर्ड तर फुगून फुगून गलेलठ्ठ झालाय इतकं की आतंरराष्ट्रीय क्रिकेट नियंत्रण करणारी आयसीसी ही बीसीसीआय ची शाखा आहे की काय अशी शंका येते. 2007 च्या टी ट्वेन्टी स्पर्धेनंतर अस्तित्वात आलेली आयपीएल नंतर तर क्रिकेटचा बाजार मोठा आणि अजून मोठा होण्या हातभार लागला. आयपीएलचा व्यवहार, त्यातील पैसा बघून एकामागे एक प्रत्येक देशाने आपआपली लीग चालू केली यामुळे काही देशातील खेळाडू देशापेक्षा क्रिकेट लीग मध्ये खेळण्यास जास्त पसंती देऊ लागले. फुटबॉल खेळात केवळ मोठ्या स्पर्धेत देशाच्या संघात खेळणाऱ्या आणि संपूर्ण वर्षभर लीग फुटबॉल खेळणारे परंपरा क्रिकेटमध्ये चालू झाली नसली तरी भविष्यात तस होणार नाही याची शाश्वती कोणीही देऊ शकणार नाही. क्लब क्रिकेट लीग क्रिकेट यामुळे पैश्याचा क्रिकेटमध्ये वावर प्रचंड वाढला हे कोणीही नाकारणार नाही पण यामुळे थोड्या फार फरकाने का होईना आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये बदल दिसू लागले आहेत. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशन (FICA) च्या अहवालातून एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार, बहुतेक खेळाडूंना त्यांच्या स्वतःच्या देशाव्यतिरिक्त इतर टी२० ल लीगमध्ये खेळायचे आहे. ज्यामुळे त्यांना अधिक आर्थिक स्थैर्य मिळवता येऊ शकते पण यामुळे मूळ क्रिकेटचा गाभा असेलेले कसोटी, एकदिवसीय सामन्याना धोका निर्माण झाला आहे. टी ट्वेन्टी सामने, लीग याच्या वाढीमुळे सगळ्यात जास्त दडपण जर कोणत्या फॉरमॅटवर आले असेल तर ते एकदिवसीय सामने. बहुतांश खेळाडू एकदिवसीय सामने खेळण्यास उत्सुक नसल्याचे अहवालात नमुद असल्याच्या अनेक बातम्या तुम्हाला आज वाचायला मिळत असतीलच.
झटपट क्रिकेट, लीग क्रिकेट, त्यातील काही तासात निकाल लागण्याची पद्धत, बेधडक खेळाडू त्याची खेळण्याची पद्धत यामुळे टी ट्वेन्टी हा प्रकार भविष्यात सर्वाधिक खेळला जाईल आणि एकदिवसीय सामने कमी होतील की काय अशी शंका वाटू लागल्याने भविष्यात हा क्रिकेटचा पर्याय जिवंत ठेवणे यासाठी एकदिवसीय सामन्यात बदल करणे क्रमप्राप्त झाले आहे. टी ट्वेन्टीच्या काळात पन्नास ओव्हरचे हे सामने कंटाळवाणे ठरू नये म्हणूनच जसे भूतकाळात 60 ओव्हर्सचे सामने 50 ओव्हर्स मध्ये बदलण्यात आले आहे तसेच आज एकदिवसीय सामने अजून 10 ओव्हर कमी करून त्या सामन्यात लोकांची उत्सुकता राहील असे काही नियम आणणे गरजेचे आहे. मी व्यक्त करीत असलेली ही शक्यता आज जरी कोणी विरोध करू शकत असेल तरी येत्या काही वर्षात एकदिवसीय सामने म्हणजे 40 ओव्हर्स हे सत्य लवकरच वास्तवात येईल ही माझी खात्री आहे.
कसोटी कितीही कंटाळवाणी वाटली तरी क्रिकेटचा मूळ गाभा असलेली स्पर्धा म्हणजे कसोटी क्रिकेट त्यानंतर लोकांची उतकंठा वाढवणारा वर्ल्डकपची स्पर्धा म्हणजे एकदिवसीय 40 ओव्हरचे सामने हे गणित येत्या वर्ल्डकप नंतर घट्ट बसू शकते. टी ट्वेन्टी मुळे समूळ नष्ट एकदिवसीय सामने होतील असे मला तरी वाटत नाही, तुमचं काय मत आहे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा