गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

मृगजळ मीडिया......

आफताब किंवा श्रद्धा नाव वाचले तरी माणसे आता पुढे स्क्रोल करू लागली आहे. एखाद्या गोष्टीची अति पब्लिसिटी विषयाचे गांभीर्य संपवू शकते ह्याचे अजून एक उदाहरण. मीडियावर निर्बध असावे, शक्यतो 24 तास बातम्या देण्यासाठी जे काही उपद्व्याप ती लोक करतात ते थांबवले गेले पाहिजे. डिबेट शो बंद नाही ना करता येत तर लाईव्ह दाखवण्यापेक्षा रेकॉर्डिंग दाखवा म्हणजे वादात्मक गोष्टी सेन्सॉर करता येतील ज्यामुळे नृपुर सारख्या महिलेला अज्ञातवासात जावे लागणार नाही आणि कन्ह्यालाल सारख्या शिंप्याचा गळा चिरला जाणार नाही. स्वातंत्र्याच्या नावावर जो उनाडपणा, उंडगापणा मीडिया करते ते सहन करण्याची पलीकडे गेले आहे. ठाम मत व्यक्त करण्यासाठी, स्वतःची एक छबी निर्माण करण्यासाठी पत्रकार निपक्ष न राहता कोणत्या ना कोणत्या पक्षाचे दलाल म्हणून काम करतात ते पाहून त्या लोकांचे वागणे पत्रकारीतेशी केलेली फसवणूक, गद्दारी असते. ब्रेकिंग न्यूज, ठळक बातमी सदराच्या खाली अक्षरशः काहीही दाखवत कधी कधी पत्रकारितेच्या सीमा ओलांडल्या जातात जे आतांकवाद्यांच्या मुंबई हल्ल्यात आपण पाहिलेच. आतांकवाद्यांना त्याच्या आतांकवाद्यांकडून कमी मीडियातून, पत्रकारांकडून अधिक माहिती मिळत होती. बोलण्याचे,लिहण्याचे हवं ते करण्याचे स्वातंत्र्य ह्या विषयाचे तुणतुणे वाजवणारे कायदा सांगणारे त्या कायद्याच्या पुढचा नियम मात्र सांगत नाही ज्यामध्ये ह्याच स्वातंत्र्याच्या हक्कावर काही निर्बंध असतात. अनुच्छेद 19 (2) जे म्हणते की वरील अधिकार भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राज्य सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता किंवा बदनामी किंवा गुन्हा करण्यासाठी चिथावणी देण्याच्या संदर्भात वाजवी निर्बधाच्या  अधीन आहेत पण ज्याच्याकडे कायद्याला मनासारखे वळण्याची ताकद खिश्यात पैसे आणि अमाप प्रसिद्धी याच्या जोरावर कायद्यालादेखील काही लोक आपल्या घरातील बटीक म्हणून ठेवतात.तस कायदा सगळ्यांना समान असला तरी श्रीमंतासाठी कायदा आणि गरिबांसाठी कायदा वेगळा आहे की काय अशी शंका कायम येत राहते ज्यात मोठ्या मोठ्या नावाची छोटी लोक चुकीच्या कामासाठी ज्यावेळी अडचणीत येतात त्यावेळी त्यांना मिळणारा अटकपूर्व जामीन, त्याच्या खटल्याचे लवकर लागणारे निर्णय तश्याच गरीब व्यक्तीच्या खटल्याशी तुलना केल्यास कायद्याचे वेगळे रूप आपल्याला पहायला मिळते. अस म्हणतात की जे वर्तमानपत्र आपण 2 तीन रुपयांना विकत घेतो त्याची खरी किंमत विकत घेतलेल्या किमतीच्या 10 पट अधिक असते. कागद, छपाईची शाई, त्यासाठी लागणारी यंत्र, पत्रकाराचे पगार, पेपर लोकांपर्यत पोहचवण्यासाठी लागणारा खर्च पाहता नक्कीच त्यापेक्षा जास्त खर्च वर्तमानपत्र काढण्यासाठी लागत असणार यात दुमत नाही मग ती लोक कमी किमतीत वर्तमानपत्र कसे विकतात?  त्यात छापल्या जाणाऱ्या जाहिराती हे ह्या सगळ्या मागचे आर्थिक गणित. जाहिराती म्हणजे वस्तू, सेवा किंवा प्रौढी मिरवण्यासाठी आजकाल  स्वतःच्याच खोट्या पण चांगल्या बातम्या समाजात पसरवण्यासाठी पेड न्यूजचा पाऊस आजकाल प्रिंट असो इलेक्ट्रॉनिक मीडिया यात पडताना आपल्याला दिसतो. सोशल मीडियावर लिहलेले आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी नियम असतात ज्याचे काटेकोरपणे पालन जी ती सोशल मीडिया नियंत्रित करणारी संस्था करत असते अशीच एक मीडियावर नियंत्रण करणारी संस्था निरपेक्ष निर्णय घेते का की प्रत्येक मीडिया सेंटर याची स्वामिनिष्ठता कोणाच्या ना कोणाच्या अंगणात बांधून ठेवलेली आहे त्या मालकसाठीच ही मिडिया भुंकत राहणार का? आजच्या काळात रावण, औरंगजेब असते तर कदाचित तेही किती चांगले, उत्तम शासक आणि त्यांनी केलेली चुकीची कामे कशी बरोबर हे पेड न्यूजच्या रूपातून तुम्हा आम्हाला समजले असते. मीडिया संस्था, पत्रकार ह्यांना त्याच्या डोक्यावर कोणताही नियंत्रणाचा अंकुश नको केवळ त्यांना मदमस्त हत्तीप्रमाणे, जसे वाटेल तसे स्वतः निर्माण करत असलेल्या वाटेवर चालायचे आहे अश्यावेळी ही लोक ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजाचे किती नुकसान ही लोक करतात याकडे यांचे अजिबात लक्ष नसते, त्यांना केवळ त्याच्या वैयक्तिक स्वार्थ साधायचा असतो अश्यावेळी योग्य ठिकाणी झालेला विरोधाला स्वातंत्र्याची गळेचीपी, मीडियावर निर्बध नावाची सबब ही लोक पुढं करतात.१९७८ चा प्रेस कौन्सिल कायदा वृत्तसंस्था, वृत्तपत्र आणि पत्रकार याच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी तसेच त्याच्यावर कायद्याने ठरवलेल्या नियमानुसार काम करण्याची ताकीद देते पण परस्पर आर्थिक तसेच वैचारिक हितसंबंध यात आड येऊन ही लोक कायद्याला वेशीवर टांगतात. आज ज्याप्रमाणे मीडिया काम करते आहे ते पाहताना त्याच्या कार्यपद्धतीत बदल करणे, त्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही हे लक्षात घेऊन त्यांना नवीन नियम, कायदे करून त्याच्या आचरटपणा, निर्बुद्धता, थांबवने गरजेचे अन्यथा मिळालेल्या ह्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन भविष्यात मीडिया ही एक स्वैर संस्था होऊन लोकांच्या विचारांना परिवर्तन करून विशिष्ट उद्देश साध्य करण्यास बाध्य करताना दिसू शकेल. राजकारण, खेळ, मनोरंजन वा अन्य छोट्या मोठ्या गोष्टीचे वार्तांकन म्हणजे बातम्या पण आजकाल जर तर सारख्या काल्पनिक, ठोकताळे, सूत्रांच्या माहितीच्या आधारावर जो हल्लाकोळ दिवस रात्र चालू असतो ते कुठंतरी थांबलं पाहिजे. 24 तास बातम्या देण्याच्या अजेंड्यामुळे 24 तास काही ना काही बातमी शोधली जाऊन त्यात काहीतरी खुपसट काढून सामाजिक स्वास्थ बिघडवणार हे माध्यम किती जुजबी, केंद्रित असले पाहिजे हे आज मीडियाला समजत नाही आहे. कधी कधी तर मीडियात झालेल्या गोष्टीमुळे वाद वाढतात तर एखाद्या ठिकाणी घडलेल्या चुकीच्या बातमीमुळे देशाच्या इतर भागात गोंधळाची निर्मिती होते. बातम्या दाखवणे हे जसे मीडियाचे काम आहे तरी आपण दाखवत असलेल्या बातमीमुळे इतरत्र हिंसाचार, द्वेष, संघर्ष वाढणार नाही याची जवाबदारी मीडिया स्वीकारणार का? स्वीकारते का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...