वाचाल तर वाचाल अस लहानपणी शिकलोय ते ही विसरलोय का?
बरं मी का इतकं पेटलोय, तुम्हाला वाचायला सांगतोय त्याला एक कारण आहे. स्वतःला बुद्धिमान समजण्याचे व्यसन मलाही आहे त्यामुळे अनाहूतपणे मिळालेल्या एका कागदाचा तुकडा मला नवीन ज्ञान देऊन गेला ते ज्ञान इथे व्यक्त करून त्यात तुम्हाला सहभागी करावे म्हणून हा लेख.
तुमचा मित्र सनातन याचा नमस्कार, आज रविवार सुट्टीचा वार आणि महिन्याचा पहिला आठवडा देखील. आज सकाळी निवांत उठलो. सकाळची कामे करायला घेतली तर आमच्या सौ हातात पिशव्या आणि महिन्याची किराणा वही घेत बाहेर पडल्या. महिनाभराचा किराणा आणण्यासाठी दोन्ही मुलीची मदत घेत छोट्या मोठ्या तीन चार पिशव्या घरात आल्या. अर्ध्या तासात मी ही सगळं आवरून सोसायटीच्या कट्यावर फिरायला बाहेर पडणार तेच दुपारच्या जेवणाचा मेनू काय असं विचारण्यात आले. अन्नपूर्णाच्या मनात जे असेल ते करा असे सांगत टाकलेला बॉउन्सर बॉल ताकदीने पूल/ हुकच्या शॉट सारखा परतावत कट्यावर बॉलिंग करायला मी बाहेर पडलो. अर्धा तास स्वतःची हुशारी आणि इतरांची टिंगल टवाळी केल्यावर पोटात दोन तीन उपाशी कावळे चक्कर येऊन पडलेत, उंदर टणाटण उड्या मारताहेत आणि कुत्र्याने तोंड वर करत भुssss करण्याआधीच घरी परतावं असे मनात आल्याने सुबह का भुला परत घरी परतला. सूर्य डोक्यावर यायचा बाकी होता तरी बाहेर उन्हाचा चटका घरात सौंच्या चिडलेल्या चेहरा ग्वाही देत होता. भरलेल्या वांगे तयार होत असलेल्या रस्यात उडी मारण्यासाठी तळमळत होते. छोटी मुलगी त्याच न आवडणाऱ्या वांग्यांना ताटात पाहून गाल फुगवून बसली होती तर मोठी मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुढील वर्षाचा अभ्यास करत होती. परिस्थितीचे गांभीर्य पाहत स्वयंपाकघरात आडव्या तिडव्या पडलेल्या त्या किरण्याच्या पिशव्या मला घरातील परिस्थिती निवळण्याची योग्य दिशा दाखवत होत्या. सुट्टीच्या दिवस असूनही अंगातील सर्व आळस झटकत किराण्याच पिशव्यामधून किराणा बाहेर काढायला लागलो आणि जे होऊ नये तेच घडले. एक छोट्या वर्तमानपत्राच्या कागदात बांधलेली कोणती तरी पिवळी डाळ स्वयंपाक घरात चौफेर पसरली आणि जिथं घरातील वातावरण खेळीमेळीचे करायला गेलेलो मी आता मोठे डोळे आणि तोंडाचा आ वासून सौ समोर बसलेलो होतो. दिवाळीच्या दिवसात दुपारी वामकुक्षी घ्यायला डोळे झाकावे आणि कोणी बाहेर सुतळी बॉम्ब फोडवा तस सौ माझ्यावर फुटली. फुटलेल्या त्या पिवळ्या डाळीचा कागद हातात तसाच पकडत पहिले हॉल मध्ये आमच्या आदरणीय बाबाच्या बाजूला येऊन बसलो. स्वयंपाकघरातून स्टीलच्या डब्याचे आदळण्याचा आवाज मला स्वयंपाक घरातील सौ चा अविर्भाव काय असेल हे महाभारतातील संजयला मिळलेल्या दिव्य दृष्टीची अनुभूती करून देत होत. दूरचित्रवाणी वरच्या बातम्या एकदम पिन ड्रॉप शांतता झालेल्या घरात उगाच शांततेचा खून करत होते आणि हॉल मधील बाबाची उपस्थिती माझा प्रतिकात्मक खून होण्यापासून वाचवत होता. असो एकंदरीत करायला गेलो एक आणि झाले भलतेच पण यावरून घरात मीच कसा राजा आहे हे वाटत नसले तरी सत्ता आपलीच चालते हे तुम्हाला सांगायला मला आवडेल. आत सांडलेली ती डाळ कोणती हे माहीत न्हवते पण तो डाळीचा वर्तमानपत्राचा कागद मात्र हातात होता.
काही लोकांना देवाने लोक वाचायला येतील अशी शक्ती दिलेली असते आणि मी तर त्यातही अव्वल आहे असे माझे मत आहे. लोक घरात पडलेले वर्तमानपत्र वाचतील अशी अपेक्षा धरू नका पण तेच वर्तमानपत्र एस टी त बसून वाचायला लागेल तर शेजारचा इच्छा नसतानाही त्यात डोकं घालत असतो हा माझा अनुभव आहे. आजच्या वर्तमानपत्राला हात ही न लावलेला मी, तो डाळीच्या पुड्याचा वर्तमानपत्राचा तुकडा वाचायला लागलो. ती एक जाहिरात होती आणि ती तुम्हाला पाहायला म्हणून त्या कागदाच्या तुकड्याचा हा तो फोटो
अनाहूतपणे मिळालेला हा तुकडा ज्ञानाची कवाडे उघडून जाईल असे वाटले नव्हते. एकीगाई आपल्याला ह्या जीवनात काय करायचे ते ध्येय देते, कायझेन त्यात प्रत्येकवेळी सुधारणा करत अधिक चांगले काम करण्यास प्रेरित करते.पोमोडोरो प्रत्येक कामात मन लागण्यासाठी, वेळेचे नियोजनाद्वारे आयुष्याचे नियोजन करणे. हारी हाची बु द्वारे जेवण भरपेट न करता थोडं रिकामे ठेवल्याने कसे फायदे होतात ते असेल की आपली चौकस बुद्धी जागृत ठेवत नवीन गोष्ट शिकण्याची नवशिक्या बनण्याची शोशिन पद्धत आपल्याला बरेच काही शिकवून जात नाही का?
कायझेन बद्दल माहिती असले तरी इतर प्रत्येक प्रकार/ टेक्निक याबद्दल मी तरी पहिल्यादा वाचत होतो त्यामुळे त्याबद्दल माहिती लगेच आजच्या काळातील प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणारे आणि विचारल्यावर समोर आणू देणारे गूगल ला विचारले आणि माहिती करून घेतली. ह्या पद्धतीबद्दल माहिती लेखातुन देऊ शकलो असतो पण ह्या पद्धतीची माहिती तुम्ही शोधा, आपल्या मुलांना सांगा कारण आपल्याला तर क्षणाक्षणाला आपल्यात चांगले बदल घडवायला आवडेल नाही का? . हे कात्रण नक्की कोणत्या वर्तमानपत्रातले माहीत नसते तरी केसरी @Kesari_Tours ह्या ट्रॅव्हल कंपनीने केलेल्या ह्या अभिनव जाहिरातीसाठी त्याचे धन्यवाद.
अशीच माहिती, लेख वाचण्यासाठी, इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी Dairynotes ह्या ब्लॉगपोस्टला follow करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया Dairynotes137@gmail.com वर मेल करा.....
परत नवीन लेख घेऊन येईपर्यंत जय श्रीकृष्ण
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा