माझे नाव विनय, मी महाराष्ट्रातील छोट्याश्या खेड्यात जन्मलो, वाढलेलो एक सामान्य मराठी कुटुंबातील साधारण मुलगा. राहते घर सोडले तर मोठा भाऊ वहिनी आणि छोटा भाऊ हीच माझी संपत्ती. भाऊ आणि वहिनी दोघे श्रद्धाळू, देवभोळे त्यामुळे घरात देव देवाचे कार्य ते स्वतः नित्यनियमाने करत आणि त्यामुळे तीच सवय मला आणि छोट्या बंधू याना लागली होती. देश पारतंत्र्यात असल्याने स्वातंत्र्य म्हणजे काय हे केवळ घरातच अनुभवायला मिळायचे. मुलांनी खूप शिकावे आणि मोठे व्हावे हा मोठ्या बंधूंचा आग्रह असल्याने मी आणि माझा छोटा बंधू गावातल्या शाळेत शिक्षण घेत होतो. शिक्षणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय हातात नसल्याने आम्ही शिक्षणात संपूर्ण झोकून दिले होते त्याचीच शाबासकी म्हणजे संपूर्ण गावात आमच्या कुटुंबाची हुशारी खास प्रसिद्ध होती. शिक्षकांचा आमच्यावर जास्त स्नेह होता त्यामुळेच की काय अभ्यासाव्यतिरिक्त बरेचसे साहित्य, देशविदेशातील बातम्या, विज्ञान याच्या बरोबर देशातील इंग्रजी राजवटीबद्दल इतम्भू माहिती मिळवण्याचे हक्काचे स्थान म्हणजे आमचे हे गुरुजन असायचे. गुरुजनांनी तसेच गावातील काही धनाढ्य व्यक्ती सतत आम्हला आमच्या शिक्षणात आर्थिक मदत करायला सतत पुढे असायचे. लोकांच्या ह्याच मदतीमुळे आमचे पाय सदैव जमिनीवर टेकलेले असायचे म्हणूनच गावातील कोणीही कामासाठी हाक मारल्यास न चुकरता आम्ही सदैव एका पायावर उभे असोयचो. ह्याच आमच्या चांगल्या स्वभावाचे फळ मला गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी गावातील लोकांनी निधी काढला आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षणासाठी मला पाठवले होते. पुण्यात आल्यावर मात्र गावापासून दूर एका वेगळ्याच जगात प्रवेश झाला. पुण्यातील एका नामांकित इंग्रजी शाळेत गावातील सरपंचाच्या मदतीने प्रवेश मिळाला होता.
पुण्यात नवीन शाळेत ज्ञानसाधनेला सुरुवात झाली. गावातील शिक्षणापेक्षा इथला दर्जा वेगळाच होता, जरी मी अभ्यासू असलो तरी इथे मात्र शिक्षकांच्या आवडत्या विद्यार्थ्यांत माझी गणना झाली नव्हती. इंगजी शाळेत व्यवस्थापन काही इंगज पाहत असल्याने इथे स्वातंत्र्यावर काही प्रमाणात गदा असली तरी ह्या शाळेत माझा देशप्रेमाचे धडे देणारा एक मित्र, गुरू मला भेटणार होता अस कोणी मला सांगितले असते तर कदाचित मला ते पटले नसते पण भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे कोणीही सांगू शकत नाही तसच माझ्या आयुष्यात समुद्राच्या प्रचंड फेसळणाऱ्या लाटा किनाऱ्या रुपी माझ्यावर येऊन आदळणार होत्या याची कल्पना मला देखील नव्हती.
भूतकाळाच्या आठवणीत रममाण झालेलो मी आणि माझ्या विचारांच्या तंद्रीला तोडत तुरुंगाचा वॉर्डन मला हाक मारत होता. " ओ डिटेक्टिव्ह, झोपला की काय डोळे उघडे ठेवून? उठा, साहेबांनी तुमची आठवण काढली आहे" अस कानावर शब्द आदळल्याने माझी तंद्री तुटली. दहा बाय दहाच्या अंधाऱ्या खोलीत गजांच्या आड असलेलो मी अचानक भानावर आलो
जेलर स्मिथ हा रागीट, दुष्ट आणि भारतीयांचा द्वेष करणारा इंग्रज अधिकारी होता. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील एका तुरुंगाचा तो अधिकारी होता. जंगलाच्या मध्यवर्ती भागात तुरुंग बांधलेला होता आणि ह्या तुरुंगातुन कोणताही कैदी अजूनपर्यत पळून जाण्यात यशस्वी झाला नव्हता असे रेकॉर्ड होते. हे रेकॉर्ड पूर्ण होण्यासाठी दोन गोष्टीं महत्वाच्या होत्या त्या म्हणजे एक स्वतः जेलर स्मिथ आणि दुसरे तुरुंगाच्या बाजूला असलेले हे जंगल. वर्षभर पुरेल असा शिधा, संरक्षणासाठी दोनशे सैनिकांची सशस्त्र फळी आणि चिरेबंदी तटबंदी असलेला किल्ल्यासमान हा तुरुंग ही जेलर स्मिथची खरी ताकद होती. तुरुंगातून पळून जाणार कैदी एकतर सैनिकांच्या गोळीने मारला जायचा किंवा जंगलातील हिंस्त्र पशूंकडून त्यामुळे ह्या तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न कोणताही चोर, दरोडेखोर असो की क्रांतिकारी करत नसायचा. क्रांतिकारी अस मनात येताच मला पुन्हा कॉलेजच्या जुन्या भूतकालीन विश्वात घुसण्याची संधीच मिळाली . तुरुंगाचा वार्डन मला जेलर स्मिथकडे घेऊन जात असताना मी मात्र माझ्या भूतकाळातील आठवणीत गुंगून गेलो.
पुण्यात येऊन महिना झाला असेल, कॉलेज, नवीन शहर, शिक्षक यात पहिला महिना कसा गेला ते कळत नव्हते. पोटापाण्याची व्यवस्था म्हणून सदाशिव पेठेत वृद्ध कुलकर्णी काकाकडे जेवणाची व्यवस्था चालू केली होती तर सकाळी कॉलेजातून परतताना काकांच्या घरी जेवायचे आणि तासभर पुण्यातील पेठा, गल्लीबोळ हिंडायचे अस दिनचर्या चालू होती. पुणे म्हणजे केवळ विद्याचे माहेरघर नाही तर क्रांतिकारक, समाजसेचक, नेत्यांचे शहर. पुण्यात वावरताना पुण्यातील लोकांचा धाडसीपणा बऱ्याच वेळा पाहिला होता. कधी कधी छत्रपती शिवाजी महाराजच्या गनिमी काव्याचा तर कधी कधी सरळ तोंडावर इंग्रज अधिकारी, पोलीस शिपाई यांच्यावर छोटे मोठे मजेशीर हल्ले कित्येकदा पहायला मिळाले होते.
एक दिवशी जेवल्यानंतर शतपावली करत शनिवारवाडा परिसरात फिरत असताना एक युवक धावत येताना मला दिसला त्याच्या मागे दोन शिपाईही धावताना दिसले. माझ्याजवळून जाताना त्याचा मला जोरदार धक्का लागला आणि त्या धक्क्याने आम्ही दोघे रस्त्यांवर पडलो. मागे धावत असणारे दोन्ही शिपाई त्या युवकाला धरावे अस ओरडत होते पण डोळ्याची पापणी लवते न लवते तो युवक कोणत्या गल्लीत घुसून पसार झाला हे मला तरी लक्षात आले नाही पण ह्या धावपळीत त्याचा चेहरा मात्र मला दिसला होता. धाप टाकत आलेले दोन्ही शिपाई माझ्या दंडाला पकडून दमात घेत त्या युवकाला पकडले का नाही असं दरडावू लागले पण ज्या वेगात हे सगळे काही घडले ते पाहता माझ्या दंडावरची पकड सैल करत तोंडात शिट्टी घालून वाजवत दोन्ही त्या युवकांच्या शोधात कोणत्यातरी गल्लीत घुसले. मीही तात्काळ शतपावली संपवत माझ्या वसतीगृहाकडे वळून धूम ठोकली. थोडीशी भीती तर वाटलीच होती पण कसे बसे धाडस गोळा करत खोलीपर्यत मागेपुढे पाहत पोहचलो. संबंध दिवस खोलीतून बाहेर पडणे सोडा,डोकावले देखील नाही. बाहेर पडलो ते दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायलाच.
दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जात असताना कालचा तोच धडकलेला मुलगा मला मैदानात दिसला. जवळच उभ्या असलेल्या मित्राला त्याच्याबद्दल विचारले तर त्याचे नाव जगदीश आहे आणि आपल्याला सिनियर असून वरच्या वर्गात आहे हे सांगितले. पोरगा अभ्यासात हुशार असला तरी तरुण टोळक्यांना घेऊन काहीतरी खुसपट करत असतो अस ही कळले. नंदू आणि मी त्याच्याकडेच पाहुन बोलतोय हे पाहून जगदीश आमच्याकडे येऊ लागला.
जगदीश दिसायला सर्वसाधारण मुलांसारखाच असला तरी रोजच्या व्यायामाने सदृढ बाधा होता. पांढरा सदरा आणि पांढरे धोतर घातलेला जगदीश जवळ आला आणि खांद्यावर हात टाकत ओळखले का मला असा प्रश्न केला. काल झालेली धडक, पाठीमागे लागलेले पोलीस असा सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून अलगद चालून गेला. अडखळत मी हो हो आठवतंय की अस बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
क्रमशः
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा