फेब्रुवारी महिना आला की तरुणाईला दोन सण खूप खुणावतात त्यातील महत्वाचा,प्रमुख सण म्हणजे #शिवजयंती
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मतारखेवरून वाद असले तरी महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही निश्चित केलेल्या तारखेशिवाय मराठी पंचांगानुसार एप्रिल महिन्यातदेखील शिवजयंती देशभरात उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. मुळात दररोज साजरा करावा असा हा शिवजयंतीचा सण केवळ दोन दिवस साजरा होणे खूपच कमी पण तरीही दोन्ही दिवशी महाराष्ट्रातील जनतेसोबत देशातील लोक शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करतात. महाराष्ट्रात तर पोर बोलायला शिकले की छत्रपती शिवाजी महाराज की जय ही आरोळी द्यायलाच पहिले शिकते म्हंटले तर वावगे ठरणार नाही. महाराजांचा जन्म शिवनेरी ह्या किल्ल्यावर झाला होता. ह्याच किल्ल्याच्या एका कमी प्रसिद्ध पण महत्वाच्या घटनेकडे तुमचे लक्ष केंद्रित करण्यासाठीच हा थ्रेड.
छत्रपती शिवाजी महाराज हे जहागीरदार आणि आदिलशहाच्या सैन्यात असलेले मराठा सरदार शहाजी भोसले यांचे मुलगे, पुण्याची जहागिरदारी शहाजी भोसले यांनी पत्नी जिजाबाई आणि बालशिवाजीच्या यांच्या खांद्यावर देखरेखीची जवाबदारी दिली गेली होती. ह्याचकाळात पुणे जहागिरीत फिरताना शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांनी मराठी जनतेची चाललेली गळेचीपी, हाल आणि सतत कोणत्या ना कोणत्या यवन सैनिकांच्या तडाख्यात होणारे हाल ह्यात जनता पिचून गेलेली पहिली होती. कधी आदिलशाही, कधी निजाम तर कधी मुघल तलवारीच्या जोरावर मराठी जनतेचे शोषण करत होते. लहानपणापासून शूर योद्धे, रामायण महाभारत याच्या गोष्टी ऐकत मोठे होणाऱ्या बालशिवाजीला आजूबाजूला चाललेल्या स्वैराचाराचा खूप राग येत असे म्हणूनच समविचारी सवंगड्याना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ उभी करण्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली होती. तयार झालेल्या ह्याच संगठणाने गमती गमतीत पुणे जहागिरीमधील तोरणा राजगड, पुरंदर सारखे महत्वाचे किल्ले जिंकल्यामुळे त्यावही प्रसिद्धी केवळ शत्रूच्या दरबारात न होता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पसरू लागली होती. केवळ स्वराज्याच्या सीमा वाढवून त्यावर सत्ता न गाजवणाऱ्या शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्याचे परस्त्रिय मातेसमान,गरिबांना मदत करणारा,शेतकऱ्याच्या शेतातील पात्याला हात न लावणारा, ज्वलंत हिंदुत्ववादी, देव देवता,मंदिर यांची काळजी घेणारा राजा अशी प्रसिद्धी सर्वदूर पसरत होती. हीच प्रसिद्धी, स्वतःचे राज्य यातून प्रेरित होऊन शिवनेरी किल्ल्यावर काही कोळी तरुणांनी यवनांचे अधिपत्य नाकारत स्वतःचा झेंडा उभा करण्याची प्रेरणा घेत धूळखात आणि यवनांचे दुर्लक्ष झालेल्या शिवनेरीवर स्वतःचे निशाण फडकवले.
कोण होते हे वीर?
जुन्नर शहराला पुराणिक तसेच ऐतिहासिक महत्व, ह्याच शहराच्या जवळ असलेला समृद्ध नाणेघाट जुन्नर शहराचे प्राबल्य सिद्ध करण्यास पुरेसे आहे. जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त बौद्धकालीन गुहा देखील आहे. केवळ ऐतिहासिक नाही तर आर्थिकदृष्ट्या जुन्नर आणि आसपासच्या परिसर खूप महत्त्वाचा त्यामुळे जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्याला वेगळेच महत्व प्राप्त झालेले होते. अश्या जुन्नर शहर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी ह्या किल्ल्याचे महत्व खूप होते. ह्या किल्ल्यावर सत्ता निजामाची असो की आदिलशाहीची वा असो मुघलांची काळजी घेण्यासाठी गडावर महादेव कोळी समाज असायचा. कोळी समाज म्हणजे मासेमारी करणारा अस ठरलेले असलं तरी जो कोळी समाज शेती करायचा त्याला महादेव कोळी अस संबोधलं जात. जुन्नरच्या आसपास राहणाऱ्या ह्या कोळी समाजाकडे किल्ल्याची राखणदारी,देखभाल ही काम पूर्वापार चालू होती. यवनांच्या दूर्लक्ष झालेल्या ह्या गडावर स्वतःचे अधिपत्य सांगून स्वतःचे राज्य उभे करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजाच्या स्वराज्य ह्या गोष्टीतून कोळी बांधवांनी घेतली होती हे विशेष. कोणताही संघर्ष नाही, कत्तल नाही पण गडावरचे निशाण आता बदलले होते.
गडावरचे निशाण बदलल्याची बातमी दिल्लीचा पातशहा जहांगीरच्या कानावर पडली. दक्षिणेत राज्य विस्तारासाठी त्याने त्याचा क्रूर, कपटी, धर्माध औरंगजेब मुलाला पाठवले होते. आदिलशहाचे दुर्लक्ष तसेच संपत चाललेल्या निजामाच्या गडांवर मुघलांचे वर्चस्व स्थापन करण्यास औरंगजेब आग्रही होता. शिवनेरी किल्ल्याचे भौगोलिक तसेच आर्थिक महत्व लक्षात घेत औरंगजेबाने शिवनेरीवर फार मोठी सैन्याची तुकडी पाठवली. सैन्याच्या ह्या तुकडीने गडावरील महादेव कोळीच्या गटाला पराभूत करत अटक केली. हा गट थोडा थोडका नसून किमान हजार लोकांचा तरी होता त्यांनी केलेले बंड आणि किल्ला ताब्यात घेतला म्हणून औरंगजेब खूप रागावला होता. अटकेत असणंऱ्या ह्या सगळ्या लोकांचा अमानुष छळ तो करत राहिला. धर्माध औरंगजेबाने एक दिवस शिवनेरी गडाच्या माथ्यावर मधोमध असलेल्या चौथऱ्यावर एका एक कोळी बांधवांना आणून त्याचा शिरच्छेद केला. इस्लामी धर्माध पुस्तकानुसार इतर धर्मीयांचे शिरच्छेद करणे, त्या शिराचे ढीग निर्माण करून दहशत माजवणे त्यातून धर्मातर करणे हे प्रकार त्यावेळी प्रसिद्ध होते. चौथाऱ्यावर केलेला हा रक्तपात एक धडा म्हणून कायम रहावा अशी ह्या क्रूर औरंगजेबाची इच्छा होती. चौथरा असलेल्या हे ठिकाणावर नंतर एक गोल घुमट बांधण्यात आले तसेच इथे फारसी भाषेत शिलालेख आढळतो. पुढे खिळखिळी झालेली आदिलशाहीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवनेरी किल्ला हस्तगत केला होता.
बंड अयशस्वी झाले, हजारो महादेव कोळी समाजाचे तरुणांची हत्या झाली असे हे शिवनेरी गडावरील ठिकाण बहुतांश लोकांना माहीत असेलच असे नाही म्हणूनच हा लेख. कधी शिवनेरीवर गेलाच तर त्या वीरांचे स्मरण करण्यासाठी इथे नक्की भेट द्या. शिवजन्मभूमी च्या शेजारी हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जिजामाता आणि बाल शिवाजी याच्या पुतळ्यामागे जी बाग आहे तिथून थोड्याच अंतरावर हे ठिकाण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा