सोमवार, १६ जानेवारी, २०२३

ऑफिस ऑफिस

भाग १. 

आजच्या धावपळीच्या युगात घराशिवाय जास्त वेळ माणूस कुठं असतो तर ऑफिसमध्ये. ऑफिस म्हणजे कामाचे ठिकाण, कामामुळे तिथे नवीन लोकांशी ओळख होते, मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतात, वैयक्तिक सुख दुःख आनंदाच्या क्षणाचे आदानप्रदान होते. कामाशिवाय अनुबंध निर्माण होतात असे असले तरी प्रत्येकाच्या अंगावर असलेली कामाची जवाबदारी हा ह्या ऑफिसचा प्रमुख गाभा असतो. 

कामाची गडबड सोडता घरापेक्षा चांगलं असणार वातावरण, मोठं मोठ्या खिडक्या, त्या खिडक्यातून दिसणारी सुपारी नारळाची झाड, हिरवाई म्हणजे काम नसताना कॉम्पुटर स्क्रीन न बघता कित्येक मिनिटं पाहत राहावं अस काम आमच्या कंपनीचा माळी करायचा. इथे उल्लेख झाला म्हणून अन्यथा माळ्याच्या कामाचे कौतुक आजपर्यत कोणी केले असेल असं माझ्या लक्षात नाही. मोकळं ढाकल वातावरण असलं तरी एक बंधीस्थपणा प्रत्येक ऑफिस मध्ये असतोच असो मूळ कारखाना आणि कर्मचारी काम करतात त्यात बरेच अंतर होते. कारखान्याच्या निगडित विभागाचे कर्मचारी जसे प्रोड्युकॅशन, मेंटेनन्स, क्वालिटी विभाग कारखान्यात असले तरी एचआर, अकाउंट, सेल्स मार्केटिंग, परचेस, प्लांनिंग आणि प्रत्येक विभागाच्या मॅनेजर, कॉन्फरन्स हॉल याची वेगळी इमारत होती. ह्याच इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला कॅन्टीन असल्याने तिथपर्यत पोहचत असताना सगळ्या केबिन मध्ये असणारे मॅनेजर, इतर डिपार्टमेंट यावर नजर मारत टिंगल्या करत जाण्याचा सुन्या आणि माझी जुनी सवय.

असाच एक दिवस कामाच्या गराड्यात अडकलेलो मी कामाचा पसारा आवरण्याचा प्रयत्न करत होतो. पाहता पाहता लंच टाइमची वेळ झाली होती. सुन्या म्हणजे आपला सुनील डेरे रोजच्या सवयीप्रमाणे वॉश बेसिंग मध्ये जाऊन डोक्यावरचा केसांचा कोंबडा सरळ करत तोंड हात धुवून एका हातात डबा घेऊन माझ्यासमोर हजर झाला होता. आता सवयीप्रमाणे त्याने काही टोमणे देण्याआधी मी हातातील काम बाजूला सरकावत स्वतःला डबा टेबलावर काढला. थोडस मी ही फ्रेश होऊन सुन्या आणि मी कॅन्टीनच्या दिशेने मार्गस्थ झालो. ऑफिसमध्ये सगळीच लोक कामात असो वा नसो पण लंच टाइमसाठी मात्र खूपच जास्त वक्तशीर होते कदाचित आधी पोटोबा नंतर विठोबा म्हणीचे माझ्यासकट सगळे अनुयायी होते. आमच्या डिपार्टमेंट मधून जात असताना इतरांच्या डिपार्टमेंट मध्ये अजाणतेपणे होणारी लुडबुड आमचीच नाही तर कोणाचीही होत असेल अक्षरशः तुमची देखील, हो तुमची देखील फक्त ती मान्य करणे जसे तुम्ही टाळणार आहे तसे आम्ही ही पण ईश्वराने डोळे दिलेच आहे तर त्याचा उपयोग करत सभोवताली काय होतंय ते पाहत जाणे म्हणजे आपला जन्मसिद्ध हक्क या अविर्भावात ऑफिसमध्ये हिंडणारी सुन्या आणि माझी जोडी होती

सेल्स आणि मार्केटिंग विभागाच्या समोरून जात असताना नवीनच ऑफिसमध्ये रुजू झालेला तेवीस चोवीस वर्षाचा पोर कॉम्पुटरमध्ये डोकं घालूम काम करताना दिसला. सुन्या आणि मी ही गोष्ट पाहून एकाचवेळी एकमेकांना पाहत नव्याचे नऊ दिवस म्हणून कुत्सित हसत कॅन्टीनकडे  मार्गस्थ झालो. सेल्स मार्केटिंग विभागाचा प्रमुख राजू वेंगुर्लेकर तसा खडूस माणूस. कामात स्वतः दिरंगाई करत असाल तरी इतरांनी ती करू नये अशी त्याची इच्छा असायची. स्वतःची चूक असली तरी इतरांवर ढकलायला हा माणूस मागे राहायचा नाही. एकतर त्याचा खोटारडा स्वभाव त्यात त्याचे हे डिपार्टमेंट. मूळच्या स्वभावाचा इतका हरहुन्नरी उपयोग कोण्या दुसऱ्या माणसाने केलेला मी तरी अजून पाहिले नाही. प्रत्येकवेळी ह्या माणसाचे सेल्सचे आकडे असो की मार्केटिंगच्या गप्पा ह्या वास्तवाच्या जमिनीवर नसून ह्यांच्या खोट्या थापाच्या आकाशात असायचे हे माझ्या लक्ष्यात यायचे पण कंपनी मॅनेजमेंटला हे लक्षात येत नाही की दुर्लक्ष करते हे मला आजपर्यत लक्षात आलेले नाही. कदाचित कामाची ठिकाणी करायचे छक्केपंजे समजत नसल्याने आपल्याच बरोबरचे अनेकांची आर्थिक परिस्थिती माझ्यापेक्षा चांगली झालेली मी माझ्या डोळ्यांनी पहिली होती.

स्वतःच्या घरातून आणलेला डबा, कॅन्टीनमधला सोडा मिश्रित भात वरण, सोबतीला असणारी स्वीट डिश यावर यच्छेद ताव मारून शतपावली करत सुन्या आणि मी परत आमच्या डिपार्टमेंटकडे परतत असताना राजू वेंगुर्लेकर त्याच्या काचेच्या केबिनमध्ये त्या नवख्या पोराला झापताना दिसत होता. तो पोरगा खाली मान घालून सगळं सगळं ऐकत होता. आईबापांच्या ओरडण्याला, आरेला कारे करणारे अनेकजण मी पाहिले असले तरी साहेबाच्या झापण्याच्या विरोधात ब्र काढणारे क्वचित असले तरी हे पोरग तोंड उघडेल अस वाटत नव्हतं. दुर्लक्ष करत सुन्या आणि मी आमच्या डिपार्टमेंटमध्ये येऊन काम करू लागलो.

सवयीप्रमाणे राजू वेंगुर्लेकर ठीक 3 वाजता आमच्या साहेबाच्या केबिनवर दोन वेळा अंगठी आपटत जिन्याने खाली उतरणे, त्याच्या पाठोपाठ असेल नसेल ते काम टाकून पुढच्या मिनिटाला राजुच्या मागे जाणे ही आता आम्हाला नित्याची बाब झाली होती. 3 वाजता राजू वेंगुर्लेकर आणि आमचा साहेब सचिन कोल्हे आणि इतर काही विभागाचे प्रमुख यांचा सुटा मारण्याचा कार्यक्रम कंपनीच्या गेटच्या बाहेर रोजच्या रोज भरत असायचा आणि आमचा कंपनीच्या आतमध्ये कट्टा भरायचा. वेंगुर्लेकर जरी मार्केटिंग टीमचा सर्वेसर्वा असला तरी त्याच्या टीममधील निल्या म्हणजे निलेश आपला एकदम चड्डीदोस्त. साहेबांची टीम सुटा मारायला गेली की निल्या आमच्या विभागात येऊन खैनीचा विडा लावत गप्पा मारायचा. विडा लावता लावता सुन्या आणि मला म्हणायला लागला वेंग्याने (वेंगुर्लेकरचे आमच्यातले खाजगीतले टोपणनाव) नव्या पोराला जाम सळो का पळो केले आहे. जेवण देखील केले नाही त्या पोराने पण काम पूर्ण झाले नाही म्हणून झाड झाड झाडले आज, शिवाय सोलापूरच्या नव्या खडूस क्लायंटकडे पाठवणार पुढच्या हप्त्यात.

सुटा मारणारी साहेबांची टीम परत येईल म्हणून की वेंग्या आल्यावर निल्यावर झाडू नये म्हणून आज निल्या खैनीचा विडा तोंडात टाकत पार्श्वभागाला पाय लावत धूम ठोकत जागेवर बसला. कामाच्या ठिकाणी नित्याची बाब म्हणत नवीन पोराला बसलेला ओरडा विसरत आम्ही आमच्या कामाला लागलो. ऑफिसमधला साहेब आणि त्याचे काम निघण्याची वेळ सारखीच असते. घरी जाण्याची वेळ जशी येते तस दिवसभर झोपलेला आपला साहेब कामाची लिस्ट मुद्दाम आपल्यापुढे वाचत असतो. कामाचा गराडा इतका बाकी असताना आपण आजही वेळेवर जाऊ शकत नाही हे मनोमन ठरवायचे असते. सचिन तेंडुलकर जसा बॉलरला ठोकायचा तस आम्हाला ठोकून साडे पाचच्या पहिल्या ठोक्याला "टोपी" आवरून केबिनच्या बाहेर पडत असतो. ( टोपी म्हणजे आमचा बॉस सचिन कोल्हेचे आमच्या खाजगीतले नाव. का? अहो टक्कल पडलंय त्याला. डोक्यावर खोट्या केसाचे विग घालून येतो तो ऑफिसात)

असलेली पण नसलेली काम करण्यासाठी पुढचा 1 तास ऑफिसमध्ये काही ना काही करणारे आम्ही सव्वा सहा वाजता ओव्हर टाइम करणाऱ्या मंडळींना मिळणारा फलाहार करण्यासाठी कॅन्टीनला निघालो. मार्केटिंग टीम मध्ये नवीन जॉइनिंग गणेश कॉम्पुटर कसलेतरी पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन बनवत होता. सुन्याने त्याला हाक मारून फलाहार करायला बरोबर घेतले. पोरग गरीब होत, पण चुणचुणीत होत, हुशार होत. बोलता बोलता मी वेंग्याचा झापण्याच कारण विचारले. गणेश काही बोलला नाही पण काहीतरी अडचण असावी म्हणून दिलासा देत मीच म्हंटल मग झाला का सोलापूर दौऱ्याची तयारी? 

तस त्या पोराने चमकून माझ्याकडे पाहिले, न राहहून म्हणाला काय सांगू साहेब, वेंगुर्लेकर साहेबाना मी दुपारी सांगत होतो की कामाचे काही नाही पण सोलापूरला जाण्यासाठी, क्लायंटकडे घालण्यासाठी माझ्याकडे कोट नाही हो. पगार झाल्यावर घेतो एक कोट म्हणजे जात जाईल तोच घालून सगळीकडे पण साहेबाना काम टाळतोय अस वाटलं आणि झाप झाप झापले हो. मामाच्या किराणा मालाच्या दुकानात काम करत मी इंजिनियरिंग पूर्ण केले. मामा देईल तितकेच पैसे त्यामुळे नवीन कोट घेता येईल असं वाटत नाही. इतकं बोलून पोरग हिरमसून बसल. त्याच्यापाठीवर दिलाश्याची पाठ थोपटत त्याला काळजी करू नको माझा कोट घालून जा अशी ऑफरच समोर ठेवली. हिरमसून बसलेला गणेशाचा चेहरा काय खुलला होता म्हणून सांगू तुम्हाला. फलाहार करत साडे सहा वाजले गणेशला कोट आणून देण्याच्या वायद्याने आम्ही घरी जाण्यासाठी आमच्या विभागात परतलो.

थोडासा ढगळा कोट घालून गणेशने सोलापूर दौरा पार केला. परत येताना सोलापूरची प्रसिद्ध शेंगदाणे चटणी स्वतःहून माझ्यासाठी घेऊन आला. नीटनेटका, व्यवस्थित केलेला माझा जुना कोट मला देत धन्यवाद मानले. सोलापूर दौऱ्यात खडूस क्लायंटकडे काय काय झालं सांगताना त्याचा चेहरा उजळून गेला होता

क्रमश:



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...