मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्येक व्यक्तीच्या ह्या स्वभावाशिवाय त्याच्याकडे एखादेतरी कौशल्य असतेच. व्यक्ती जीवन जगताना स्वतःचा स्वभाव आणि आपले कौशल्य घेऊनच जीवन प्रवास करत असतो. आपल्या जीवनाची गाडी निश्चित असलेल्या मुक्कामावर नेत असताना हा स्वभाव आणि कौशल्य आपला प्रवास किती सुखकर किंवा वेदनादायक होणार हे ठरवत असतो. कोणाचा प्रवास सुखाचा तर कोणाचा दुःखाचा होतो याला कारणीभूत असा स्वभाव हा त्या व्यक्तीच्या आवड निवड, इच्छा अपेक्षा,प्रेम आणि इतर मानवी भावभावना व्यक्त करत असतो. 

एक चौकोनी कुटुंब, प्रामाणिक,प्रेमळ, कुटुंब पहिले मानणारा कुटुंबप्रमुख छोट्याशा पगारात मुलांना इंग्रजी शाळेत घालणे, बायकोची स्वयंपाकात असलेली आवडीला पाठिंबा देणारा एक सामान्य माणूस. माणूस सामान्य असला तरी त्याचे पलंगावरील काम मात्र असामान्य असते,तास दीड तासाचा स्टॅमिना असलेला हा एकदा पैश्याच्या टंचाईला सामोरा जातो आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपले पलंगावरील कौशल्य वापर करून पैसे कमवायला लागतो अशी साधारण गोष्ट असलेली वेबसिरीज त्रिभुवन मिश्रा सी ए टॉपर

मुळात सेन्सॉर बोर्ड ची भीती नसल्याने नागवेपण दाखवण्याच्या सगळ्या सीमा निर्माते, दिग्दर्शक कथेची गरज म्हणत दाखवत असतात. चित्रपट समाजाचा आरसा असतो किंवा समाज घडवत असतो असे म्हंटले जाते पण जर समाज वेबसिरीज मध्ये तसा असेल किंवा तसा घडणार असेल तर दोन्ही गोष्टी नैतिकता, संस्कार यांचे अधपतन झाले म्हणून समजले पाहिजे. पुरुष नालायक असू शकतो पण स्त्रिया शरीरसुखासाठी असे काही करत असतील असे माझं मन तरी मनात नाही. हो काही अपवाद असतील पण ज्या पद्धतीने चित्रपटातील नायकाचा व्यवसाय वाढला ते पाहता चारित्र्यवान स्त्रिया यांची संख्या बोटावर मोजावी इतकी राहिली असे वाटायला लागले. संभोग स्त्रिला खराब करत नाही असा डायलॉग मारताना संभोग वाईट नाही पण नैतिकता, चारित्र्य, शील संभोगासाठी वेशीवर टांगणारी स्त्री खराबच नाही का? चित्रपटाच्या शेवटी तर नायकाची पत्नी जी घर सांभाळणारी स्त्री असते ती नायकाला सोडून तिच्या कुटुंबाबाह्य संबंध असलेल्या व्यक्तीबरोबर निघून जाताना दाखवले आहे. ज्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अक्षरशः घाणेरडे काम करणाऱ्या त्या व्यक्तीची नक्की काय चुकी? स्त्री माता, बहीण, पत्नी, मुलगी असते, स्त्री नवजीवन देणारी असते ती इतकी व्यभिचारी होऊ शकते का? एकंदरीत एक विषय म्हणून सिरीज मनोरंजन करत असली तरी माणूस, माणुसकी, समाज याबद्दल एक मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते............


बुधवार, ३१ जुलै, २०२४

कंडोम

९० च्या काळात एड्स आणि एड्सबद्दलची जनजागृती यामुळे टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती सर्रास दिसत असल्याच्या. बलवीर पाशा कौन है ते मादक ललना पुरुषाशी अंगचटीला येताना घराच्या लोकांसमोर जाहिरात पाहणे म्हणजे टाळणे लहान मुलाच्या सुप्त गुणात वाढ करणारा मुद्दा बनला होता. वर्गातील एखाद द्वाड,उनाड कार्ट कंडोमचे रिकामे पाकीट उकिरड्यावरून वा कुठून तरी उचलून त्यावरील मादक महिलेचे चित्र दाखवण्यासाठी केलेली नाटक अजूनही डोळ्यासमोरआहे. कंडोम हातात येण्याचा दुर्मिळ योग कसा आला लक्षात नसले तरी कोण्या एका पोराने तो कंडोम आणला आणि मैदानावरील हापस्याच्या तोंडाला लावून त्यात इतकं पाणी भरले की साधा हवा भरून फुगणाऱ्या फुग्यापेक्षा कितीतरी पट पाणी बसून न फुटलेला कंडोम सारख्या मटेरियलचे खेळायचे फुगे का बरं बनवत नसतील असा प्रश्न पडला. बहुतेक या प्रसंगानंतर कंडोम न पाहता त्याबाबद्दल पडलेले अनेक प्रशांची उत्तरे मिळाल्याने त्यातील उत्सुकता कमी झाली पण त्यानंतर कंडोम कुठं पहायला मिळाला तो कॉलेजला गेल्यावर. काही मुले तरुणपणात आल्याचे संकेत, इंद्रिय सुख मिळवण्यासाठी तर काही केवळ संधी मिळाली तर बरोबर असावे म्हणून खिशातील पाकिटात ठेवायला लागली होती. सामाजिक व्यवस्थेत होणारा बदल किंवा टिव्हीने लोकांची बदललेली मते याचे हे साधे उदाहरण.लहान मुलांनी संस्कार, नीतिमत्तेच्या धडे घ्यावे, सनातन धर्मातील आध्यत्मिक गोष्टीतून नवीन नवीन गोष्टी शिकाव्या यापेक्षा ती पिढी पुढारलेल्या विचार करत होती की पाश्चात्य संस्कृतीत अडकत होती हे ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर असावे असे मानून आपण पुढे बोलू.

कंडोम ह्या विषयावर आज बोलायला घेतले ते सतत दोन तीन बातम्यामधून ऑलिम्पिकमधील खेळाडूंना दिलेल्या कंडोमच्या पाकिटे, संपूर्ण स्पर्धा संपेपर्यत कंडोमच्या वापरात होणारा प्रचंड खप ह्या बातम्या तुमच्या अंगावर येतील यात माझ्या मनात शंका नाही. स्त्री पुरुष एकमेकांकडे आकर्षले जाणे, त्याच्यात संभोग होणे स्वाभाविक असले तरी मानाच्या स्पर्धेत भाग घेणारे खेळाडूंना महिना अर्धा महिना संभोग न करता आपल्या पदकाच्या ध्येयाचा पाठलाग का करता येत नाही की केवळ पाश्चात्य पद्धती अनुसरून एकमेकांना भोगायचे, इंद्रिय सुख मिळवण्याचा हा सोप्पा प्रकार तर नाही ना? काही अभ्यास तर संभोग केल्याने तुमचे मन शांत होते, एकाग्र होते त्यामुळे खेळाच्या आधी संभोग केल्यास यश मिळवणारे अनेक खेळाडूची मनोगत,मुलाखती झालेल्या आहेत. जस शाळेतील तो एक द्वाड, उनाड मुलगा कंडोमचे पाकीट उकिरड्यावरून आणून इतरांना ज्ञान देत कंडोमची माहिती देत इतरांना द्वाड करत होता तसेच भ्रामक आणि संभोग केल्याने यश मिळते ही विचारसरणी प्रगल्भ होत इतरांनी ती अनुसरली नसेल का? संभोग केल्याने खेळाडूंची ताकद, एकाग्रता वाढत असेल तर ध्यान करणारे, ब्रम्हचर्याचे अधिष्ठान करणारे अनेक संत, मुनी आपली एकाग्रता कशी वाढवत होते बरं? स्पर्धेत मिळवलेले पदक त्यामुळे त्या खेळाडू आणि देशाची होणारी उंच प्रतिमा यासारखे ध्येय असताना स्वतःची ताकद, एकाग्रता वाढवण्यासाठी संभोग हे आत्मसुखाचे, स्वार्थी कारण पुढे करत शरीरसुखात लिप्त होणारे खरे तर खेळाडू आहेत का याबद्दल मनात प्रश्न येतात. कंडोम हा एकदाच वापरतात तस संभोग हे एकमेव ध्येय घेऊन हे खेळाडू खेळाच्या सगळ्यात मोठ्या जत्रेत नवनवीन जोडीदाराशी संभोग करण्यासाठी तर एकत्र जमत नाहीत ना?

एकवेळ होती की थोडं नागवेपण, कंडोमची जाहिरात, सॅनिटरी पॅड, चित्रपटातील नायक नायिकेचे एकमेकांजवळ येण्याचे प्रसंग आले की लाजेकाजे मोठी माणसे तरी नजर फिरवायचे किंवा लहान मंडळी उठून जायची पण आता कधी कोणत्या प्रसंगात कोण कोणाच्या तोंडात तोंड टाकून, बेड सिन टीव्हीवर चालू होईल सांगता येत नाही इतकं सहज आपले आयुष्य झाले आहे. त्यात सामाजिक परिस्थिती, अर्थकारण यामुळे झालेले बदल माणसाला नैतिकता, सुसंस्कृतपणा, संस्कार, नित्तीमत्ता सारख्या गुणापासून दूर तर नेत नाही आहे ना? विद्यार्थ्याने उद्या एकाग्रता येण्यासाठी संभोग गरजेचा असा अभ्यास उद्या प्रकाशित झाला तर आपल्या पाल्याना आपण मोकळे सोडणार का? प्रत्येक वयाची काही गरजा असतात हे जरी मान्य असले तरी कोणती गरज गरजेची, योग्य हे ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंना का नसावी? कंडोम, शरीरसुख हेच खरे सुख असते हे भ्रामक स्वप्न दूर केले पाहिजे. पंधरा वीस दिवसाच्या या स्पर्धेत जर खेळाडू आपल्या देशाची मान उंच करण्याचे ध्येय, पदक लुटण्याची शक्यता यापेक्षा मोठं ध्येय कोणते असू शकते की जे तुमच्या मनाला एकाग्र बनवेल? जर संभोगाशिवय मन केंद्रित होत नसेल तर हा एक वैचारिक आजारच नव्हे का?

संभोग किती, कोणी, कसा करावा हा ह्या लेखाचा विषय नाही की कंडोम बद्दल माहिती नाही. विषय माणसाची मती माती होत आहे, अविचाराने चुकीच्या गोष्टींना पाठबळ मिळत आहे असं वाटल्याने हे चार शब्द लिहले आहे. ज्या ज्या वयात जे जे कार्य करायला हवे, ज्या कामासाठी नियुक्त केले आहे ते तडीस नेण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची भावना, बुद्धी क्षीण होत आहे हे चित्र बदलायला हवे  की नाही हे आता तुमच्यावर.......

पुढील लेख सादर करेपर्यत जय श्रीकृष्णा मित्रांनो......

शनिवार, १३ जुलै, २०२४

इंडियन

नेता असो की अभिनेता वा अन्य कोणीही त्याची सार्वजनिक बाजू, केलेले काम यातून एक त्याची प्रतिमा बनते आणि त्या प्रतिमेच्या प्रेमात पडून अनेक त्या लोकांच्या प्रेमात पडतात, त्याला आदर्श मानायला लागतात पण ही लोक वास्तविक त्याच्या वैयक्तिक जीवनात तसेच असतात का? नसतील कदाचित मग ह्या लोकांना त्याच्या कामाच्या बदल्यात देवत्व बहाल करून त्यांना एक आदर्श म्हणून मागे मागे फिरणाऱ्या सर्व जनतेने घेतलेला निर्णय चुकीचा नाही का? कमल हसन चित्रपटात आणि वैयक्तिक आयुष्यात अश्या दोन गोष्टीत फरक केला पाहिजे. वास्तविक मला तो चित्रपटात किंवा त्याच्या वैयक्तिक सार्वजनिक जीवनात देखील आवडत नाही तरीही त्याचा इंडियन हा चित्रपट पाहिला. वर्तमानपत्रात चित्रपटाचा रिव्ह्यू येतो त्याप्रमाणे चित्रपटाची कथा, कलाकारांची यादी सरत शेवटी चित्रपटाचा शेवट न सांगता चित्रपटातील चांगल्या आणि खराब गोष्टी अशी एकंदरीत मांडणी आणि त्याला दिलेले इतके तितके स्टार असलेले  लेख तुम्ही खूप वाचले असतील. कधी कधी ते प्रायोजित असतात तर कधी ते खरे देखील पण चित्रपट समीक्षा म्हणून ह्याच पद्धतीने लोकांना चित्रपट सांगायचा असतो हा वर्तमानपत्रांचा पायंडा पण आपले तसे नाही त्यामुळे आपण काहीही लिहू शकतो. मुळात हे सगळं वाचायचे असेल तर उद्याचा कोणताही एक पेपर विकत घेऊन हा कॉलम तुम्हाला वाचता येईल त्यामुळे तो पायंडा सोडून चित्रपट पाहिल्यावर मनात आले ते ब्लॉग मध्ये उतरवत आहे.

भ्रष्टाचार ह्या मूळ मुद्यावर असलेला हा चित्रपट पहायला अप्रतिम आहे पण आपल्याच पालक, सगेसोयरे याच्या कुकर्माची शिक्षा त्याच्याच घरातील लोक देतील का? नाही कारण एकच घरात राहून त्यानी केलेली अव्यवहार्य वागणूक पाहून पाहून ती अंग वळणी पडून गेलेली असते. मुळात आपले पालक काय बरोबर वा चुकीचे करतात हे सगळ्यांना माहीत असते पण त्याबद्दल कोणी तक्रार करू शकत नाहीत पण चित्रपटात अशी अनेक पाल्य इंडियनच्या सांगण्यावरून आपल्या पालकांना जगासमोर उघडे करतात असे दाखवले असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र पोर्श कारने ज्यावेळी आपला पाल्य दारूच्या नशेत दोन लोकांचा जीव घेतो त्यावेळी संपूर्ण कुटुंब आपल्या पाल्याला वाचवण्यासाठी कसे वागते हे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर आणल्यानंतर लक्षात येते की चित्रपट केवळ मनोरंजनाचे हत्यार आहे त्यातून केवळ मनोरंजन अपेक्षित राहिले आहे अश्या वेळी इंडियन चित्रपट आपले मनोरंजन करेलच.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ज्या पद्धतीने भ्रष्ट पात्रांचे विबंडन केले आहे ते पाहताना मज्जा तर येतेच शिवाय मतदार म्हणून कधी याला तर कधी त्याला मत द्यायचे याव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या हातात प्रत्येक वेळी मिळणाऱ्या फसवणुकीला हात चोळत बसण्याशिवाय मार्ग नाही असे सांगतो. बरे भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा होत असताना आपल्या घरापर्यत ज्यावेळी झळ पोहचते त्यावेळी योग्य असलेल्या इंडियनला हुकूमशहा, खुनी ठरवत सगळी जनता त्याच्यावर आक्रमण करते,त्याला मारायला घराबाहेर पडते. जोपर्यत इंडियन करत असलेले सामाजिक कार्य लोकांच्या घरात पोहचले नव्हते तोपर्यत आणि घरापर्यंत पोहचल्यानंतरचा इंडियन यात जनतेत झालेला बदल पाहिल्यानंतर शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात असे का म्हंटले जाते ते कळेल. घरात जेवायला काय करायचे यावरून चौकोनी कुटुंबातील चार लोकांचे चार कोपरे धरून मेनू सांगतात तर जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात लोक कोणत्या एका मतावर एक येतील का? धर्मा धर्मात आता जाती जातीत भांडणारे आहे. प्रत्येकाचे काही न काही ध्येय, त्या ध्येयात मदत करणारे अनुसारक, राजकारण किती किळसवाणे आहे याची लोकाना कल्पनाच नाही कारण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या राजकीय गटाचा अनुसारक असल्याने कोणाला तरी विरोध कोणाला तरी सपोर्ट हे भांडण काही देशात संपेल असे वाटत नाही. 

माणसाचा स्वार्थ, लोभ इतका वाढलाय की लोकसंख्येच्या गर्दीत असे कितीही इंडियन आले तरी जनता त्यांना मारून आपले स्वार्थ साध्य करतील. नैतिकतेच्या चौकटीत राहून जगणारे जितके असतील त्याच्या दहापट, शंभरपट अनैतिक लोक असणार त्यामुळे कालियुगाच्या या टप्प्यात इंडियन असो की सामान्य माणूस तो पिसला जाणार, त्याचा पराभव होणारच. आता पुढे काय इंडियन नंतर इंडियन 2 आला आणि चित्रपट संपेपर्यंत इंडियन 3 ची पुडी सोडली गेली तरी फिल्मी आणि वास्तव जीवनातील खरी दरी अधिकाधिक वाढत जात आहे, जाणार आहे. कोणी काय करावे, न करावे याचे धडे कितीही दिले तरी भ्रष्टाचार रुपी हा राक्षस दिवसेंदिवस अजून शक्तिमान होणार आहे त्यामुळे तुम्ही ज्याला आदर्श मानत आहे, बनवणार आहे तो खरच त्या आदर्श ह्या व्यक्तिरेखेच्या जवळ आहे का हे तपासले पाहिजे. योग्य आणि अयोग्य ओळखता यायला हवे. कोणाच्याही हातचे बाहुले आपण बनत तर नाही ना हे पाहिले पाहिजे. इंडियन चित्रपटात जसे स्वतःचे घर भ्रष्टाचार मुक्त करा असा नारा देतो तसे आजच्या घडीला आपले विचार, आचार चरित्रवान करण्यावर भर दिल्यास हाव, लोभ, मी, माझे, स्वार्थ यावर विजय मिळवता येईल हे सत्य असले तरी भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात असा बदल होईल का?

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...